दहा महिन्यात बँकांमध्ये आल्या ३९.२४ लाखांच्या बनावट नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:06 AM2018-07-28T00:06:50+5:302018-07-28T00:09:38+5:30
जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या १० महिन्यांच्या कालावधीत नागपुरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण ३९ लाख, २४ हजार, ९०० रुपयांच्या बनावट नोटा पोहचल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या १० महिन्यांच्या कालावधीत नागपुरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण ३९ लाख, २४ हजार, ९०० रुपयांच्या बनावट नोटा पोहचल्या.
रिझर्व्ह बँके तर्फे शुभा शांताराम काकडे (वय ५५, रा. सहकारनगर) यांनी सदर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदवली. त्यानुसार, वेगवेगळ्या बँकांमध्ये नमूद कालावधीत बनावट नोटांची ३३१ प्रकरणे उघडकीस आली. वेगवेगळ्या इसमांनी जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या १० महिन्यांच्या कालावधीत १००, ५०० आणि १ हजारांच्या एकूण ५३४० बनावट नोटा जमा केल्या. त्यांचे एकूण मूल्य ३९ लाख, २४ हजार, ९०० रुपये आहे. सदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ७४ हजार लंपास
लकडगंज हद्दीत अशोक एकनाथ लांबट (वय ४५, ओमसाई नगर, कळमणा) यांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून ७४ हजार रुपये काढून घेतले. त्यांना १८ जुलैला रक्कम काढून घेतल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
गिफ्टचे आमिष दाखवून ३० हजार हडपले
लकडगंजमधील गरोबा मैदान, कापसे चौकाजवळ राहणारे रमेश वसंतराव सौदेकर (वय ४८) यांना २८ फेब्रुवारीला ९५६०५ १६८७१ क्रमांकाच्या मोबाईलधारकाने फोन करून गिफ्ट लागल्याचे आमिष दाखवले. ते मिळवण्यासाठी सौदेकर यांच्या मोबाईलवरचा ओटीपी क्रमांक मिळवला आणि त्याआधारे त्यांच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर सौदेकर यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दुस-याच्या भूखंडाची विक्री करून महिलेचे ७५ हजार हडपले
दुस-याच्या मालकीचा भूखंड आपला आहे, अशी थाप मारून आरोपी सतीश चंद्रकुमार चवटिया (रा. गोळीबार चौक, बाजीराव गल्ली) याने आशा संजय राऊत नामक महिलेला ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. आशा राऊत या यशोधरानगरात राहतात. वांजरा परिसरात एक हजार चौरस फुटाचा भूखंड दाखवून आरोपी सतीशने आशा राऊत यांना तो ७५ हजारांत विकत देण्याचा करार केला होता. रक्कम घेतल्यानंतर आरोपीने विक्रीपत्र करून दिले नाही. दरम्यान, तो भूखंड दुस-याच एका व्यक्तीचा असल्याची माहिती आशा राऊत यांना कळाली. त्यांनी आरोपीला आपली रक्कम परत मागितली असता तो टाळाटाळ करू लागला. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने राऊत यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सतीशविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे.