पार्सलच्या नावावर ३.९९ लाख रुपये लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 01:09 PM2021-08-06T13:09:55+5:302021-08-06T13:11:02+5:30
Nagpur News विवाह नाेंदणी संकेत स्थळावरून ३१ वर्षीय तरुणीची माहिती व माेबाईल क्रमांक मिळवित तिच्याशी लग्न करण्याचे बतावणी केली. तिच्याकडून ३ लाख ९९ हजार ६९० रुपये मिळवित तिला लुबाडल्याची घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतलवाडी येथे नुकताच घडली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विवाह नाेंदणी संकेत स्थळावरून ३१ वर्षीय तरुणीची माहिती व माेबाईल क्रमांक मिळवित तिच्याशी लग्न करण्याचे बतावणी केली. तिला विश्वासात घेत पार्सल पाठविण्याच्या नावावर तिच्याकडून ३ लाख ९९ हजार ६९० रुपये आरटीजीएसद्वारे मिळवित तिला लुबाडल्याची घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतलवाडी येथे नुकताच घडली.
शीतलवाडी, ता. रामटेक येथील ३१ वर्षीय तरुणीने सहा महिन्यापूर्वी विवाह जुळविणाऱ्या एका संकेतस्थळावर नाेंदणी केली हाेती. त्यात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मरगन ऑक्सफाेर्ड, रा. युनायटेड किंगडम याने तिच्याशी फाेनवर संपर्क साधला. फाेन काॅल व चॅटिंगच्या माध्यामातून त्याने तिचा विश्वास संपादन केला व लग्न करण्याची बतावणीही केली. त्याने १७ जुलै राेजी पार्सल पाठविले असल्याचे तिला सांगितले.
दिल्ली येथील दाेघांना तिच्याशी संपर्क करीत त्या पार्सलसाठी २० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तिने १८ जुलै राेजी त्यांनी दिलेल्या युनियन बॅंकेच्या खात्यात २० हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी एक लाख डाॅलर्सची मागणी केली. त्यांचे वारंवार फाेन येत असल्याने तिने २० जुलै राेजी ९३ हजार ८०० रुपये आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात जमा केले. त्यानंतर तिने २६ जुलै राेजी २ लाख ८५ हजार ८९० रुपये त्यांना आरटीजीएसद्वारे पाठविले. तिला अद्यापही पार्सल प्राप्त झाले नाही.
या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक प्रमाेद मकेश्वर करीत आहेत.