पाच कोटीचे अत्याधुनिक मोबाईल आॅपरेशन थिएटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:30 PM2018-07-21T21:30:54+5:302018-07-21T21:35:16+5:30
वेस्ट फॉर अॅनिमल मिशन रेबीज संस्थेच्या माध्यमातून भारतातील ११ शहरात मागील चार वर्षापासून मिशन रेबीच राबविल्या जात आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. पाच कोटीची मिशन रेबीजची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (आॅपेशन थिएटर)नागपुरात २८ जुलैपर्यंत वास्तव्यास आहे. यात शस्त्रक्रियेसोबतच प्रशिक्षण कक्षाचीही सुविधा उपलब्ध आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेस्ट फॉर अॅनिमल मिशन रेबीज संस्थेच्या माध्यमातून भारतातील ११ शहरात मागील चार वर्षापासून मिशन रेबीच राबविल्या जात आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. पाच कोटीची मिशन रेबीजची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (आॅपेशन थिएटर)नागपुरात २८ जुलैपर्यंत वास्तव्यास आहे. यात शस्त्रक्रियेसोबतच प्रशिक्षण कक्षाचीही सुविधा उपलब्ध आहेत.
प्रोजवेस्ट फॉर अॅनिमल मिशन रेबीज ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. यूकेस्थित मिशन रेबीज आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरी
सर्व्हिस इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर (व्हीव्हीएस आयटीसी) यांच्या सहकार्याने मिशन रेबीज हा उपक्रम मागील पाच वर्षापासून राबविला जात आहे. देश-विदेशातील सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमावर खर्च केला जातो. पशुवैद्यकांना तसेच पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना पशुपक्षीय नियंत्रण आणि रेबीजचे लसीकरण संदर्भात प्रशिक्षण दिले जाते. यातून तज्ज्ञ पशुवैद्यक तयार व्हावे. हा यामागील हेतू असल्याची माहिती वेस्ट फॉर अॅनिमलचे सचिव डॉ. शशिकांत जाधव यांनी दिली. नागपुरात २ ते १४ जुलै तसेच १६ ते २८जुलै या दरम्यान महाराज बाग समोरील पशुवैद्यकीय रुग्णालयात ही अत्याधुनिक व्हॅन उभी करण्यात आलेली आहे. मिशन रेबीजच्या माध्यमातून आजवर ५५० पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मिशनच्या माध्यमातून शहरातच नव्हे तर दुर्गम भागातही पशुवैद्यक व पशुपालकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवित आहे. सोबतच प्राण्यांना आजार झाल्यास त्यापासून घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजनांची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाते. तसेच अनेस्थेसिया, अल्ट्रासाऊं ड आणि पशु वर्तन याची माहिती दिली जाते. पशुवैद्यकीय व्यावसायिकांची पुढील पिढी अधिक तज्ज्ञ असावी, यासाठी प्रशिक्षणाकरिता उच्च दर्जाची उपकरणे वापरली जातात.
कुत्र्यावरील जटील शस्त्रक्रि या केल्या जातात. यात टयुमर (कर्करोगाचा एक प्रकार) व अन्य गंभीर आजार असलेल्या कुत्र्यांचा समावेश असतो. नागरिकही आपल्या पाळीवर कुत्र्यावर उचपार करू शकतात, अशी माहिती जाधव यांनी दिली. वेस्ट फॉर अॅनिमलचे अध्यक्ष डॉ. श्रीधर गुदे यांच्यासह पथक या कामात सहकार्य करीत आहेत.
प्रशिक्षणार्थींना अभ्यासाची संधी
पशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी तसेच या व्यवसायातील व्यक्तींना मिशन रेबीजच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. गेल्या चार आठवड्याच्या कालावधीत २० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पशुपालकांनाही मार्गदर्शन केले जाते.
कुत्र्यांवर नसबंदीसाठी उपयोग व्हावा
नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर आहे. वर्षाला आठ ते नऊ हजार लोकांना कुत्री चावा घेतात. याला आळा घालण्यासाठी मिशन रेबीजचा उपयोग व्हावा, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे.