नागपुरात वाहन विकण्याच्या बहाण्याने ६.७५ कोटीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 09:40 PM2018-10-03T21:40:54+5:302018-10-03T21:42:10+5:30
बोगस दस्तावेजाच्या आधारावर इनोवा गाडीची विक्री करून ६ लाख ६५ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली. कोराडी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस दस्तावेजाच्या आधारावर इनोवा गाडीची विक्री करून ६ लाख ६५ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली. कोराडी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चेतन संजय मांडवकर रा. पांजरा, कार्तिक गंगाधर चटप आणि त्याचा भाऊ चैतन्य चटप रा. नटराज को-आॅपरेटिव्ह सोसायटी नारा अशी आरोपींची नावे आहेत. तर राजेश भुरे रा. भंडारा असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपींनी रजेश यांच्याशी इनोवा गाडी (क्रमांक एम.एच.४० ए.आर. ७६७०) ही ७ लाख ६५ हजार रुपयात विकण्याचा सौदा केला. या गाडीचे मूळ मालक रवींद्र भगतकर हे आहेत. चेतनने तो स्वत: रवींद्र भगतकर असल्याचे सांगून गाडीचा सौदा केला. बोगस दस्तावेज बनवून गाडी विकली. रुपये घेतल्यानंतर भुरे यांनी गाडीचे दस्तावेज आरटीओमध्ये त्यांच्या नावाने ट्रान्सफर करण्यास सांगितले. तेव्हा मात्र आरोपी टाळाटाळ करू लागले. अनेकदा सांगूनही टाळाटाळ होत असल्याने त्यांनी स्वत: माहिती काढली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरोपींना आपले पैसे परत मागितले. वरंवार मागणी केल्यावर आरोपींनी एक लाख रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम मात्र देण्यास पुन्हा टाळाटाळ करू लागले. अखेर भुरे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.