पीठ गिरणी चालकाच्या पत्नी व मुलीला सात हजार रुपये पोटगी
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 12, 2024 06:27 PM2024-03-12T18:27:08+5:302024-03-12T18:28:07+5:30
नागपूर : पीठ गिरणी चालकाच्या पत्नी व मुलीला मंजूर झालेली एकूण सात हजार रुपयाची मासिक पोटगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
नागपूर : पीठ गिरणी चालकाच्या पत्नी व मुलीला मंजूर झालेली एकूण सात हजार रुपयाची मासिक पोटगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. पती मासिक ३० ते ३५ हजार रुपये कमावतो. त्यामुळे ही पोटगी अवास्तव नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला.
संबंधित दाम्पत्य करण व कविता (काल्पनिक नावे) बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. करण व त्याचे नातेवाईक कविताचा शारीरिक-मानसिक छळ करीत होते. करणने कविताला ग्राम पंचायत निवडणूक लढण्यासाठी बळजबरी केली होती व निवडणूक हरल्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, तो कविताला माहेरून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत होता.
२०२१ मध्ये त्याने कविता व मुलीला घराबाहेर काढले. कविताकडे उत्पन्नाचे काहीच साधन नाही. त्यामुळे तिने पोटगीकरिता कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २० जुलै २०२३ रोजी कुटुंब न्यायालयाने कविताला चार हजार व मुलीला तीन हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केली. परिणामी, करणने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता पोटगी कायम ठेवून करणची याचिका फेटाळून लावली.