८५० रुपयांचे वीज मीटर १,८०० रुपयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:11 AM2021-03-17T11:11:11+5:302021-03-17T11:12:05+5:30
नागपूर जिल्ह्यात विजेच्या मीटरची टंचाई आहे. महावितरण ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहे. परिणामत: ग्राहकांना दुप्पट किंमत देऊन बाहेरून मीटर खरेदी करावे लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात विजेच्या मीटरची टंचाई आहे. महावितरण ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहे. परिणामत: ग्राहकांना दुप्पट किंमत देऊन बाहेरून मीटर खरेदी करावे लागत आहेत. ८५० रुपयांचे सिंगल फेज मीटर १,८०० रुपयांत, तर थ्री फेज मीटर १,५२० रुपयांऐवजी ३,५०० रुपयांत घ्यावे लागत आहे.
राज्यातच मीटरची टंचाई आहे. नागपुरात मागील चार महिन्यांपासून ही स्थिती आहे. महिनाभरापासून ६ हजार मीटरची मागणी सुरू आहे. नव्या जोडण्यांसाठी किंवा मीटर बदलण्यासाठी प्रतीक्षा सुरू आहे. निकड असणारे बाहेरून खरेदी करीत आहेत. दुकानदार या परिस्थितीचा फायदा घेत किंमत वाढवीत आहेत.
टेस्टिंगचा भुर्दंड
ग्राहकांनी बाहेरून आणलेले थ्री फेज मीटर टेस्ट करणे बंधनकारक आहे. गरज वाटल्यास महावितरण याची तपासणी करू शकते. बाहेरून मीटर खरेदी करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाने परवानगी दिली आहे. सिंगल फेज मीटरसाठी चार व थ्री फेज मीटरसाठी तीन कंपन्यांनी उत्पादित केलेले मीटर अधिकृत ठरविले आहे.
महावितरणची अडचण कायमच
महावितरणला मागील आठवड्यात ६ हजार मीटर मिळाले. मात्र, मागणीच्या तुलनेत ही संख्या पुरेशी नाही. हे मीटर फक्त महिनाभरच पुरणार आहेत. त्यामुळे मीटर मिळूनही महावितरणची समस्या कायमच आहे.
...