‘कॅशलेस’ इंधनाचा तेल कंपन्यांवर २९०० कोटींचा भुर्दंड

By admin | Published: April 28, 2017 02:53 AM2017-04-28T02:53:42+5:302017-04-28T02:53:42+5:30

एकीकडे सरकार ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचे तुणतुणे वाजवत असताना तीन सरकारी तेल कंपन्यांवर मात्र कॅशलेस पेट्रोलमुळे

Rs.2900 crore on 'cashless' fuel oil companies | ‘कॅशलेस’ इंधनाचा तेल कंपन्यांवर २९०० कोटींचा भुर्दंड

‘कॅशलेस’ इंधनाचा तेल कंपन्यांवर २९०० कोटींचा भुर्दंड

Next

सोपान पांढरीपांडे  नागपूर
एकीकडे सरकार ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचे तुणतुणे वाजवत असताना तीन सरकारी तेल कंपन्यांवर मात्र कॅशलेस पेट्रोलमुळे तब्बल २९०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ या त्या तीन कंपन्या आहेत.
नोटाबंदीनंतर सरकारने ‘कॅशलेस’ पेट्रोल/ डिझेल खरेदी करण्यावर (म्हणजे क्रेडीट/ डेबिट कार्डाद्वारे) प्रचंड भर दिला. त्यासाठी सरकारतर्फे ०.७५ टक्क्यांची सवलतही ग्राहकांच्या खात्यात जमा होते. परंतु याचाच दुसरा भाग म्हणजे कार्ड खरेदीवर लागणाऱ्या ट्रान्झक्शन अथवा सर्व्हिस चार्जचा भुर्दंड कोणी सहन करायचा यावरून तेल कंपन्या व त्याचे डिलर म्हणजे पेट्रोल पंप मालक यांच्यात वाद झाला. याचे कारण पेट्रोलवर डिलरांना कमिशनपोटी रु. २.५० मिळतात तर कॅशलेस व्यवहारासाठी त्यातून तब्बल रु. १.४० ते १.५० रुपये सर्व्हिस चार्ज लागतो. त्यामुळे आम्ही हा भुर्दंड सहन करणार नाही अशी भूमिका पेट्रोलपंप मालकांनी घेतली.

नोटाबंदीनंतर सरकारने ‘कॅशलेस’ पेट्रोलवर भर दिल्यामुळे सर्व कंपन्यांचे कार्ड सेल्स म्हणजे क्रेडिट/ डेबिट कार्डाद्वारे होणारी विक्री प्रचंड वाढली. साहजिकच तेल कंपन्या व पेट्रोल डिलरांमधील वादही तीव्र झाला. जानेवारीमध्ये सर्व्हिस चार्जच्या विरोधात पेट्रोल डिलरांनी पंप बंद ठेवण्याची धमकी दिली तेव्हा सरकारने हा सर्व्हिस चार्ज तेल कंपन्यांनी १ एप्रिलपासून द्यावा असा निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणून कार्ड सेलवर बँका जो सर्व्हिस चार्ज पेट्रोल डिलरांकडून घेते तो आता तेल कंपनी डिलरच्या खात्यात जमा करते आहे. परिणामी तेल कंपन्यावर हा नवा भुर्दंड आला आहे. पेट्रोल डिझेलसाठी बँका पूर्वी २ ते २.५० टक्के सर्व्हिस चार्ज घेत होत्या. परंतु आता बहुतेक बँकांनी हा दर एक टक्क्यावर आणला आहे. त्यामुळे सर्व्हिस चार्जचा एक टक्का व ग्राहक सवलतीचा ०.७५ टक्का असा एकूण १.७५ टक्क्यांचा भुर्दंड सध्या तेल कंपन्या सहन करीत आहेत. नोटाबंदीपूर्वी हा सर्व भार ग्राहकांवर पडत होता.

भुर्दंड २९०० कोटीचा
इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांची एकूण उलाढाल रु. ८.४० लाख कोटी आहे. त्यापैकी कार्डद्वारे होणारी विक्री १.६८ लाख कोटी आहे. यावर एक टक्का बँक सर्व्हिस चार्जपोटी रु. १६८० कोटी व ०.७५ टक्के ग्राहक सवलतीपोटी रु.१२६० कोटी असा एकूण २९४० कोटीचा भुर्दंड तिन्ही तेल कंपन्यांवर येणार आहे. या कंपन्यांचा नफा २३,६०० कोटी आहे. तो १२ टक्के घटणार आहे.

 

Web Title: Rs.2900 crore on 'cashless' fuel oil companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.