नागपुरात एपी एक्स्प्रेसमध्ये ६० हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:15 PM2018-09-17T22:15:56+5:302018-09-17T22:18:54+5:30
एपी एक्स्प्रेसच्या बी १ या एसी कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे बेवारस पाकिटे असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने रात्री २.३० वाजता या गाडीची तपासणी करून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एपी एक्स्प्रेसच्या बी १ या एसी कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे बेवारस पाकिटे असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने रात्री २.३० वाजता या गाडीची तपासणी करून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला.
१७ नोव्हेंबरच्या रात्री २२४१५ एपी एक्स्प्रेसचे मुख्य तिकीट निरीक्षक महेश कुमार पटेल यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. या गाडीच्या बी १ कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे तीन पाकिटे बेवारस स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही गाडी रात्री २.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. यावेळी सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल, एस. बी. कामिलकर, संदीप डोंगरे, सहायक उपनिरीक्षक अनिल कुंवर यांनी बी १ कोचच्या शौचालयाची तपासणी केली. यावेळी त्यांना प्लायवूडच्या मागे तीन खाकी रंगाची पाकिटे आढळली. त्यानंतर श्वान रेक्सद्वारे या पाकिटाची तपासणी केली असता श्वानाने पाकिटात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. तिन्ही पाकिटे उघडून पाहिली असता त्यात ६० हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजा आढळला. कागदोपत्री कारवाईनंतर निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशावरून सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल यांनी हा गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केला.
रेल्वेस्थानकावर दारूच्या १०७ बॉटल जप्त : दोघांना अटक
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील जवानांनी सलग ११ व्या दिवशी दोन तस्करांविरुद्ध कारवाई करीत दारूच्या ११०६० रुपये किमतीच्या १०७ बॉटल जप्त करण्यात आल्या.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, जवान विकास शर्मा, विवेक कनोजिया सोमवारी दुपारी २.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. तेवढ्यात १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव राहुल चंद्रभोगली कुत्तावर (२५) रा. साईबाबा वॉर्ड, बल्लारशा आणि रोशन गौरीशंकर परिहार (२२) रा. मैसदेही, बैतुल असे सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ९५५० रुपये किमतीच्या ८१ बॉटल आढळल्या. दुसऱ्या कारवाईत प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर दुपारी ४ वाजता इटारसी एण्डकडील भागात विवेक कनोजिया यास एक बेवारस बॅग आढळली. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १४१० रुपये किमतीच्या २६ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू आणि आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द करण्यात आले.