संघ शाखांत ४४ टक्क्यांहून अधिक वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:58 AM2019-03-09T10:58:05+5:302019-03-09T10:59:21+5:30
संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: २०१४ साली केंद्रातील सत्ताबदलानंतर याला जास्त जोर आला आहे. मागील आठ वर्षांत संपूर्ण देशभरात संघशाखांमध्ये ४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: २०१४ साली केंद्रातील सत्ताबदलानंतर याला जास्त जोर आला आहे. मागील आठ वर्षांत संपूर्ण देशभरात संघशाखांमध्ये ४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २०१४ नंतर संघशाखांची संख्या सुमारे आठ हजारांनी वाढली आहे.
गेल्या काही वर्षापासून संघाचा कार्यविस्तारावर भर आहे. संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ््यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दैनंदिन संघ शाखांसोबतच मासिक मिलन तसेच साप्ताहिक मिलनावरदेखील संघ स्वयसेवकांचा भर दिसून येत आहे. २०१२ साली देशात ४० हजार ८९१ संघ शाखा होत्या. मार्च २०१४ मध्ये हाच आकडा ४४ हजार ९८२ वर गेला. मागील वर्षी मार्च महिन्यात नागपुरात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या वेळी संघ शाखांची संख्या ५८ हजार ९६७ इतकी होती. वर्तमान स्थितीत ही संख्या ५९ हजार २६६ इतकी झाली आहे. वेगवेगळ््या वयोगटाचा विचार केल्यास शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षाखालील लोकांच्या शाखांची टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी आहे. देशपातळीवर संघाकडून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यादेखील शाखा लावण्यात येतात.
मासिक व साप्ताहिक मिलनातदेखील वाढ
व्यावसायिक व नोकरदारांना अनेकदा कामामुळे दैनंदिन शाखेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे साप्ताहिक मिलनाच्या माध्यमातून संघाशी जुळून राहण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. २०१२ मध्ये देशभरात ८५०८ ठिकाणी साप्ताहिक मिलन व्हायचे. वर्तमान स्थितीत १७ हजार २२९ ठिकाणी साप्ताहिक मिलन तर ८ हजार ३८२ ठिकाणी मासिक मिलन शाखा भरविण्यात येतात. २०१७ साली साप्ताहिक मिलन शाखांची संख्या १४,८९६ इतकी होती. तर मागील वर्षी हा आकडा १६,४०५ इतका होता. वर्षभरात साप्ताहिक मिलन शाखांमध्ये ८२४ ने वाढ झाली आहे.