कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली, सरसंघचालकांची मोदी सरकारला शाबासकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 09:59 AM2019-10-08T09:59:29+5:302019-10-08T10:06:05+5:30
कलम 370 हटवण्यासह गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले.
नागपूर - कलम 370 हटवण्यासह गेल्या लर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. मोदी सरकारमध्ये साहसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे, अशी शाबासकीही भागवत यांनी दिली. तसेच इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचेही सरसंघचालकांनी कौतुक केले. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी तिने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले, असे सरसंघचालक म्हणाले.
जन अपेक्षाओं को प्रत्यक्ष में साकार कर, जन भावनाओं का सम्मान करते हुए, देशहित में उनकी इच्छाएँ पूर्ण करने का साहस दोबारा चुने हुए शासन में है। धारा 370 को अप्रभावी बनाने के सरकार के काम से यह बात सिद्ध हुई है। - डॉ. मोहनजी भागवत #RSSVijayaDashami#संघ_विजयादशमी
— RSS (@RSSorg) October 8, 2019
आज विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा नागपूरमधील रेशीमबाग येथे होत आहे. या मेळाव्यात उपस्थित स्वयंसेवकांना मोहन भागवत यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, ''मागील सरकारला परत निवडून आणून देशाच्या जनतेने त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला आहे. सोबतच येणाऱ्या काळासाठी अनेक अपेक्षादेखील व्यक्त केल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. देशाची सुरक्षेची स्थिती, सैन्यदलाची तयारी, शासनाचे सुरक्षा धोर व आंतरराष्ट्रीय राजकारणात दाखविलेली कुशलता यामुळे आज जनता आश्वस्त आहे. जनतेची परिपक्व बुद्धी व कृती, देशात जागृत झालेला स्वाभिमान, शासनाचा दृढसंकल्प व वैज्ञानिक सामर्थ्य यामुळे मागील वर्ष संस्मरणीय राहिले आहे.''
''देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीमा प्रदेशात सुरक्षा रक्षक तसेच चौक्यांची संख्या वाढवावी लागेल. तसेच सागरी सीमेवरील बेटांच्या सुरक्षेत वाढ व्हायला हवी,'' असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन व्हावे
कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा तसेच सत्तेवर असलेल्यांचे स्वागतच व्हायला हवे. आता ३७० च्या आडून न झालेली कामे पूर्ण होतील तेव्हाच हे पाऊल पूर्ण होईल, असे समजले जाईल. तेथून घालविण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले पाहिजे. तसेच काश्मीर खोºयात रोजगार निर्मितीदेखील व्हावी, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
समरसतेची स्थिती हवी तशी नाही
दरम्यान, सरसंघचालकांनी सामाजिक भेदभावावरदेखील भाष्य केले. समाजात एकात्मता, समता व समरसतेची स्थिती जशी हवी होती, तशी अद्याप नाही. याचा लाभ देशविरोधी तत्व घेतात. समाजात भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, असेदेखील डॉ.भागवत म्हणाले.