Mohan Bhagwat: “हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच”: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 09:21 PM2022-02-06T21:21:43+5:302022-02-06T21:23:10+5:30
Mohan Bhagwat: लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यावर मोहन भागवत बोलत होते.
नागपूर: हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. हिंदू हा कोणताही एक धर्म नाही, ती प्राचीन, हजारो वर्षांपासून आजतागायत सुरू असलेली एक आचरण पद्धती आहे. देशात धर्म, परंपरा वेगळ्या असू शकतात. मात्र, देशवासीयांची आचरण पद्धती बहुतांश प्रमाणात एकच आहे. देशात बंधुभाव, विविधतेतील एकता आजही टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही. तुम्ही मान्य करा अथवा नाही भारत हिंदू राष्ट्रच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली मते परखडपणे मांडली.
धारणा करणारा नियम म्हणून धर्म
देशात विविध धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धारण करणारा नियम म्हणजे धर्म होय. हिंदू हा धर्म नाही, ती सनातन काळापासून चालत आलेल्या परंपरांची आचरण पद्धती आहे. भारत हा सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. हिंदू हे इझम नाहीए. सनातन काळापासून सुरू असलेल्या जो सर्वसमावेश धर्म आहे, त्याला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव
श्रीमद् भागवत ग्रंथांत सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या सांगितले गेले आहे. या गोष्टी कधीही बदलत नाहीत. यालाच आज हिंदू धर्म मानले गेले आहे. मात्र, वास्तविक पाहता हीच बाब भारतातील सर्वधर्मांमध्ये सांगितली गेली आहे. सत्याची अनुभूती, अनुभव प्रत्येकाने घ्यावा. मी सांगतो, तेच सत्य मानावे, अशी शिकवण कोणत्याही धर्मांत दिलेली नाही. प्रत्येक धर्मियांच्या पूजा-अर्चा, परंपरा यांमध्ये वैविध्य आढळते, भिन्नता नाही, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. देशकाल परिस्थितीनुसार आचार धर्म बदलत राहतो. त्याला चिकटून राहणे चुकीचे. काळानुरुप बदल घडवणे, बदल स्वीकारणे आणि बदल करत राहणे आवश्यक आहे. प्राचीन काळानुसार, चालत आलेल्या अनेक पद्धती, रिती, परंपरा यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणूनच हिंदूत्व शाश्वत आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती. त्यामुळे हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.