सत्य, अहिंसेच्या जोरावर भारतीय व्यक्तीच राजकारण करु शकते; सरसंघचालकांकडून गांधीजींच्या कार्याचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:44 AM2018-10-18T09:44:55+5:302018-10-18T10:41:20+5:30
संघाच्या व्यासपीठावरुन मोहन भागवत यांच्याकडून महात्मा गांधीजींच्या कार्याचं कौतुक
नागपूर: सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकतं, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे, अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांचं कौतुक केलं आहे. ज्यांचा साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता, अशा इंग्रजांचा सामना महात्मा गांधीजींनी निशस्त्रपणे केला. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी दोन हात केले, असं भागवत म्हणाले. संघ मुख्यालयात आज विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी महात्मा गांधींच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत.
सध्या अतिशय लहानसहान गोष्टीदेखील मोठ्या करुन त्याबद्दल आंदोलनं केली जातात, असं म्हणत सरसंघचालकांनी जेएनयूमधील डाव्या विद्यार्थी संघटनांना लक्ष्य केलं. 'भारत तेरे तुकडे होंगेच्या घोषणा देणारे, दहशतवाद्यांशी संबंध असणारे लोक आंदोलनांमध्ये दिसतात. याचा राजकीय लाभदेखील घेतला जातो. यामागे पाकिस्तान आणि इटलीचा हात आहे. आजकाल शहरी माओवाददेखील उफाळून आला आहे. काही लोकांना बंदुकीच्या जोरावर सत्ता मिळवायची आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी डाव्या संघटनांवर निशाणा साधला.
भारत पंचामृताच्या मंत्राच्या आधारे पुढे गेला, तर नक्की महागुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणीही आमचं शत्रू नाही. आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही. मात्र जगातील अनेकजण आम्हाला शत्रू मानतात, असं सरसंघचालक म्हणाले. पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झालं. मात्र त्यांच्या कृती आणि कारवायांमध्ये फरक पडलेला नाही. कोणीही आपल्यावर हल्ला करण्याचा विचारसुद्धा करु शकणार नाही, इतकं सामर्थ्यशाली आपण व्हायला हवं, असं सरसंघचालक भागवत यांनी म्हटलं.