इतर देशांची नक्कल मारून भारत आत्मनिर्भर होणार नाही: सरसंघचालक मोहन भागवत
By योगेश पांडे | Published: December 8, 2022 10:47 PM2022-12-08T22:47:48+5:302022-12-08T22:48:00+5:30
जी-२० समुहाचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही असामान्य बाब
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाची प्रगती केवळ लोकांची बुद्धिमत्ता किंवा तंत्रज्ञानाच्या आधारावर होत नाही. त्यासाठी समाजाचे भाव व विचारदेखील सकारात्मक असावे लागतात. जगातील इतर देशांकडून चांगले ज्ञान नक्कीच स्वीकार केले पाहिजे. मात्र नवीन भारताचे निर्माण करताना देशाचे मूलतत्व कायम ठेवावे लागेल. इतर देशांची नक्कल मारून भारत आत्मनिर्भर होणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ते गुरुवारी बोलत होते.
रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला वाराणसी येथील काशी महापीठाचे जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मागील काही वर्षांपासून भारतीयांचा जागतिक पटलावर आत्मविश्वास वाढला आहे. जी २० समुहाचे अध्यक्षपद भारताकडे येणे ही असामान्य बाब आहे. मात्र ही सुरुवात आहे. आणखी बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. भारताला विश्वगुरू करायचे असेल तर संपूर्ण समाजाला एकत्रित यावे लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी दक्षिणामूर्ती विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
प्रत्येकाने शिस्तीचे पालन करावे
लोकांना व्यक्तिगत व सामाजिक शिस्तीचे पालन करावे लागेल. स्वतंत्र देशात शिस्तीचे पालन हीच देशभक्ती आहे. नागरिकांना हा माझा देश आहे या भावनेतूनच वागावे लागेल, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरदेखील म्हणाले होते. संविधान व कायद्याचे पालन करायला हवे, असे डॉ.भागवत यांनी प्रतिपादन केले.
मुलांना लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार द्या
आधुनिक काळात तरुणांचा व्यवहार बदलला आहे. मुलांवर लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार होणे आवश्यक आहे. जे आईवडीलांची सेवा करू शकत नाहीत, ते देशाची सेवा करू शकणार नाहीत. संस्कारनिर्मितीसाठीच वीरशैव लिंगायत मंच संघासोबत काम करत आहे, असे प्रतिपादन डॉ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
काय म्हणाले सरसंघचालक?
- संघ सर्वांनाच स्वयंसेवक मानतो. काही आज आहेत तर काही भविष्यात होतील.
-सृष्टी आमची माता आहे. म्हणूनच पृथ्वी, गाय, नदी या सर्वांना कृतज्ञतेतून आईचा दर्जा दिला आहे.
- हिंदू सर्व समाजांना घेऊन चालतो. केवळ एका पुजापद्धतीचे नाव हिंदू नाही. विविधता घेऊन आपण एकत्रितपणे जगू शकतो. जो हे जाणतो तोच हिंदू आहे.
-भारताला जगाला जिंकायचे नाही, तर जगाला जोडायचे आहे.
- भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असतात. भावना भडकावून, दंगे भडकावून स्वतःची पोळी शेकणारे लोक देशातदेखील आहेत.
- पंथ, धर्म, जात, भाषा यापेक्षा देशहितालाच महत्त्व द्यावे
- सामाजिक समता केवळ बोलण्याने येत नाही, ती सद्भावनेने येते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"