RSS Headquarters bomb threat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:56 PM2022-12-31T23:56:24+5:302022-12-31T23:56:57+5:30
सायबर क्राईमच्या माध्यमातून निनावी फोन करणाऱ्याचा शोध सुरू
RSS Headquarters bomb threat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेनागपूरातील मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने एकच खळबळ माजली आहे. एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला हा फोन केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवली असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान, गेल्या महिन्यातही सचिन कुलकर्णी नावाच्या महापारेषणच्या अभियंत्याने संघ मुख्यालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या धमकीबाबतही तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने रा स्व संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविणार असल्याची धमकी दिली. नियंत्रण कक्षाने लगेच पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठांना याची माहिती दिली. QRT कमांडोसह पोलिसांच्या तुकड्या संघ मुख्यालयात पाठविण्यात आल्या. पोलीस उपायुक्तांनी लगेच संघ मुख्यालय गाठून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. संघ मुख्यालयाला उडविण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.
सायबर क्राईमच्या माध्यमातून निनावी फोन करणाऱ्याचा शोध घेणे सध्या सुरू आहे. गेल्या महिन्यात सचिन कुलकर्णी नावाच्या इसमाने संघ मुख्यालय उडविण्याची धमकी दिली होती. त्याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी सुध्दा पोलिसांना अशाच प्रकारचा संशय आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलीस विभागात खळबळ उडविण्यासाठीच कुणीतरी धमकी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. "संघ मुख्यालय उडविण्याच्या धमकीचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्यालयाची सुरक्षा वाढविली असून सायबर क्राईमच्या पथकाद्वारे फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल", अशी माहिती झोन-३चे पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली आहे.