संघ मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 11:29 AM2022-02-03T11:29:32+5:302022-02-03T11:39:47+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेकी केल्याच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसला सोपविण्यात आला आहे.
नागपूर : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेकी केल्याच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसला सोपविण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला.
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित जम्मू काश्मीर येथील रईस अहमद नावाच्या दहशतवाद्याने पाकिस्तानातील म्होरक्याच्या आदेशावरून संघ मुख्यालयाची रेकी केली होती. १३ जुलै २०२१ रोजी रेकीसाठी नागपुरात आला होता. रेकी करून तो १५ जुलैला जम्मू काश्मीरला परत गेला. जम्मू-काश्मीरमध्ये स्फोटके पकडल्या गेल्यानंतर रईसने संघ मुख्यालयाची रेकी केल्याचा खुलासा झाला होता. त्यानंतर नागपूर पोलिसात खळबळ उडाली होती.
गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांना रईसला विचारपूस करण्यासाठी जम्मू-काश्मीरला पाठविण्यात आले. त्या आधारावर ६ जानेवारीला कोतवाली ठाण्यात अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ॲक्ट (युएपीए) च्या कलम १८, २०, ३८ आणि ३९ नुसार दहशतवादी हल्ल्याची तयारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास गुन्हे शाखा करीत होती. बुधवारी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला.
एटीएस गुन्हे शाखेकडून प्रकरणाचे दस्तावेज मिळवून तपास सुरु करणार आहे. ते रईस अहमदला अटक करून चौकशी करणार आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडेही सोपविण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.