संघ पदाधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा, पद न सोडण्याचा दिला सल्ला
By योगेश पांडे | Published: June 6, 2024 05:41 PM2024-06-06T17:41:31+5:302024-06-06T18:19:59+5:30
Nagpur : संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी जाऊन घेतली भेट
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या निकालात महायुतीला मोठा धक्का बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखविली आहे. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ॲक्शन मोडमध्ये आला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेत त्यांच्याची दीड तास चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पद न सोडण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फडणवीस नागपुरात दाखल झाले. तेथून ते थेट त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी गेले. तेथे त्यांना भेटायला आलेल्यांची गर्दी होती. मात्र फडणवीस आज कुणालाच भेटणार नाहीत असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात संघाचे तीन पदाधिकारी अगोदरपासूनच फडणवीसांच्या घरी बसून होते. फडणवीस यांनी त्यांच्याशी भेट घेतली व दीड तास चर्चा चालली. त्यानंतर एका कारमध्ये बसून तीनही पदाधिकारी रेशीमबाग स्मृतिमंदिराच्या दिशेने रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या राजकीय परिस्थितीत फडणवीस यांना संयमाची भूमिका घेण्याची सूचना करण्यात आली आहे. पद सोडण्याचा विचार सध्या करू नका असा सल्लादेखील देण्यात आला आहे. ही भेट झाल्यावर पावणेपाच वाजताच्या सुमारास फडणवीस तातडीने नवी दिल्लीकडे रवाना झाले.
फडणवीसांना सल्ला की दिल्लीसाठी संदेश ?
सध्या नागपुरात संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग - द्वितीय हा अखिल भारतीय पातळीवरील प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. त्यानिमित्ताने सरसंघचालकांपासून संघाचे अनेक मोठे पदाधिकारी नागपुरातच आहे. निकालामुळे संघालादेखील धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दीड तास फडणवीसांशी नेमकी काय चर्चा केली याबाबत त्यांनी मौन साधले. फडणवीस लगेच दिल्लीला रवाना झाल्याने संघाने त्यांच्या हाताने दिल्लीला काही महत्त्वाचा संदेश पाठविला आहे की काय या चर्चांनादेखील उधाण आले आहे.