देशातील इतर विद्यापीठातदेखील संघाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:28 PM2019-07-12T22:28:01+5:302019-07-12T22:29:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बी.ए.’च्या (चतुर्थ सत्र) अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा समाविष्ट करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर देशातील इतरही विद्यापीठांमध्ये संघाचा इतिहास शिकविल्या जात आहे. इतर विविध संस्थांसमवेत संघालादेखील नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले तर त्याला विरोध का, असा सवाल कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बी.ए.’च्या (चतुर्थ सत्र) अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा समाविष्ट करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर देशातील इतरही विद्यापीठांमध्ये संघाचा इतिहास शिकविल्या जात आहे. इतर विविध संस्थांसमवेत संघालादेखील नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले तर त्याला विरोध का, असा सवाल कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला आहे.
नागपूर विद्यापीठातील ‘बीए’ (इतिहास) च्या अभ्यासक्रमात यावर्षी बदल करण्यात आला आहे. मागील वर्षीपर्यंत द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रात ‘भारताचा इतिहास १८८५-१९४७’ या पेपरमध्ये तिसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘कम्युनॅलिझम’चा उदय व विकास याऐवजी देशाच्या उभारणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान या धड्याला स्थान मिळाले. यानंतर या मुद्यावरून राजकारण तापले आहे. संघाच्या दबावाखाली या वर्षीपासून अभ्यासक्रम बदलण्यात आला, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआयतर्फे करण्यात आला. तसेच अभ्यासक्रमात बदल करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात येत आहे.
यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी अभ्यासक्रमात कुठलाही बदल करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. अभ्यासक्रम हा अभ्यास मंडळांनी तयार केला आहे व विद्वत्त परिषदेची मान्यता घेण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह विविध राज्यांतील विद्यापीठांत संघाच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश आहे. नागपूर विद्यापीठात ‘बीए’च्या अभ्यासक्रमात १८८५ ते १९४७ या कालावधीतील इतिहास आहे. यात मुस्लीम लीग, राष्ट्र सेवादल इत्यादी संघटनांचादेखील समावेश आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.
२००३ पासून आहेत संघाचे धडे
शिवाय संघाचा इतिहास हा यावर्षी प्रथमच शिकविण्यात येत आहे, असेदेखील नाही. २००३ पासून नागपूर विद्यापीठातील ‘एमए’च्या चतुर्थ सत्रात ‘आधुनिक विदर्भाचा इतिहास’ या पेपरला चौथ्या ‘युनिट’मध्ये संघाचा मुद्दा आहे. विदर्भातील सर्वच मोठ्या संघटनांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. बीएच्या विद्यार्थ्यांना लघु स्वरूपात संघाचा धडा आहे. डॉ.शरद कोलारकर यांचे पुस्तकदेखील अभ्यासक्रमासाठी वापरण्यात येते, अशी माहिती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.सतीश चाफले यांनी दिली.
शिक्षण मंचच्या दबावात निर्णय
दरम्यान, अभ्यासक्रम बदलावर विद्यापीठ वर्तुळात प्रशासनावर काही सदस्यांकडून टीका करण्यात येत आहे. सद्यस्थितीत विद्यापीठ शिक्षण मंचचे विद्यापीठाच्या प्राधिकरणांवर वर्चस्व आहे. त्यामुळेच त्यांच्या दबावापुढे झुकून प्रशासनाने अभ्यासक्रमात बदल केला आहे, असा आरोप होत आहे. संघाचा अभ्यासक्रमात समावेश कसा झाला तो वेगळा मुद्दा आहे. मात्र प्रशासन वारंवार शिक्षण मंचसमोर झुकताना दिसून येत आहे व ते योग्य नाही, असे मत विधिसभा सदस्य व ‘यंग टीचर्स फोरम’अध्यक्ष डॉ.बबन तायवाडे यांनी व्यक्त केले. अभ्यासक्रम बदलाअगोदर विद्यापीठाने यासंदर्भात चर्चा करणे अपेक्षित होते, असे प्रतिपादन माजी व्यवस्थापन परिषद सदस्य महेंद्र निंबर्ते यांनी केले.