रा. स्व. संघाचे मा. गो. वैद्य यांचे निधन, माजी बौद्धिक व प्रचार प्रमुखाच्या जाण्याने संघ वर्तुळात शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 05:53 AM2020-12-20T05:53:26+5:302020-12-20T05:53:57+5:30
Ma Go Vaidya : ११ मार्च, १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेल्या मा.गो. वैद्य यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले. १९४६ ते १९६६ या कालावधीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार माधव गोविंद (मा.गो.) उपाख्य बाबूराव वैद्य (वय ९७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने संघ वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, पाच मुले, नातवंडे असा परिवार आहे.
११ मार्च, १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेल्या मा.गो. वैद्य यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले. १९४६ ते १९६६ या कालावधीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९६६ मध्ये ते पत्रकारितेत आले. १९७८ ते १९८४ या कालावधीत ते विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्यही होते.
संघाच्या मुशीतच घडलेले ‘मा.गो.’ यांनी अ. भा. बौद्धिक प्रमुख, अ.भा. प्रचार प्रमुख, प्रवक्तेपद या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. याशिवाय २००८ सालापर्यंत ते संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे निमंत्रित सदस्यही होते. साहित्य क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला होता. २२ पुस्तकांचे लेखन त्यांच्या हातून झाले.
आज अंत्यसंस्कार
प्रतापनगर येथील त्यांच्या राहत्या घरून रविवारी सकाळी ९.३० वाजता अंत्ययात्रा निघेल व अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार होतील.
मा. गो. वैद्य हे प्रतिष्ठित लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात मोठे योगदान दिले. भाजपला मजबूत करण्यासाठीही त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान