संघाच्या शतकपूर्तीसंदर्भात देशभरातील प्रचारकांचे राजस्थानात मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 08:45 AM2022-06-23T08:45:00+5:302022-06-23T08:45:06+5:30
Nagpur News ७ ते ९ जुलै या कालावधीत राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित या मंथन बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे देखील सहभागी होतील.
योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेची १०० वर्षे डोळ्यासमोर ठेवून कार्यविस्तारावर भर देण्यास सुरुवात केली आहे. शतकपूर्तीनिमित्त देशभरात संघातर्फे विविध उपक्रम व सेवाकार्य राबविल्या जाणार आहेत. यांची रूपरेषा काय असेल तसेच कार्यविस्ताराची योजना कशा प्रकारची असेल याची व्यूहरचना निश्चित करण्यासाठी संघाच्या देशभरातील प्रांत प्रचारकांतर्फे मंथन करण्यात येणार आहे. दोन वर्षात देशभरातील शाखांची संख्या एक लाखापर्यंत नेण्याचा संघाचा मानस आहे. त्यादृष्टीने ७ ते ९ जुलै या कालावधीत राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित या मंथन बैठकीत यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे देखील सहभागी होतील.
संघातर्फे नियमितपणे देशभरातील सर्व प्रांतांच्या प्रचारकांच्या बैठका होत असतात. मात्र या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे संघाच्या बैठकांना दोन वर्षे काहीसा ब्रेक लागला होता. या बैठकीत कार्यविस्तारावर भर राहणार आहे. सोबतच संघटनेच्या इतरही महत्त्वाच्या मुद्यांवर यात चर्चा होईल. या बैठकीला प्रांत प्रचारकांसह सह प्रांत प्रचारकदेखील उपस्थित राहतील. सोबतच सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त यांच्यासह कार्यविभाग प्रमुख, सह प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारिणीचे प्रचारक सदस्य व संघाशी निगडित संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्रीदेखील उपस्थित राहतील, असे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- संघातर्फे देशभरात आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण वर्गांचा आढावा
- पुढील वर्षाची कार्ययोजना
- सरसंघचालकांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवास योजनांची निश्चिती
- कार्यविस्ताराची योजना
- सेवाकार्यांवर मंथन