शहरी नक्षलवादावर संघाचा प्रहार :देशाविरोधात रचताहेत षडयंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 08:29 PM2018-10-19T20:29:36+5:302018-10-19T20:30:25+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
शहरी माओवाद्यांच्या षडयंत्रात राजकीय महत्वाकांक्षी व्यक्ती किंवा समहू, दुर्बल वर्ग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी ओढण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून समाजात फुटीरता, हिंसा, द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारत तेरे टुकड़े होंगे’ अशा घोषणा ज्या समूहांतून आल्या, त्यांचेच प्रमुख चेहरे अप्रिय घटनांमध्ये प्रमुखतेने आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून समोर आले. हिंसात्मक कारवायांचे पोषणकर्ते आता शहरी माओवादाला ढाल बनवत आंदोलनांत समोरच्या रांगांमध्ये दिसतात. शहरी माओवाद्यांची रचलेल्या जाळ्याचा सर्व घटनाक्रम केवळ विरोधकांचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशविदेशांतील भारतविरोधी शक्तींच्या मदतीने रचण्यात आलेले मोठे षडयंत्र आहे, असा आरोप यावेळी डॉ.भागवत यांनी केला.
गांधी, आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव
यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. देशात नागरिकांनी कायदा व संविधान यांच्या मयार्देत रहायला हवे. आपले राजकारणी तसेच प्रत्येक व्यक्तीने पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे नेहमी स्मरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकतं, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी नि:शस्त्रपणे दोन हात केले, असे डॉ.भागवत म्हणाले.
नवीन शैक्षणिक धोरण कधी ?
नवीन पिढीवर संस्कार करण्याची गरज आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांत पायाभूत सुसंस्कारांचा अभाव झाला आहे. शिक्षणाचे नवीन धोरण प्रत्यक्ष लागू होण्याच्या प्रतिक्षेत वेळ हातातून निघून चालली आहे. नवीन युगात जे चांगले आहे ते खुल्या मनाने आत्मसात करत अभद्र गोष्टींपासून वाचण्यासाठी नवीन पिढीत विवेक निर्माण करावा लागेल, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.