बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार
By योगेश पांडे | Updated: March 22, 2025 00:01 IST2025-03-22T00:01:16+5:302025-03-22T00:01:58+5:30
बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार
योगेश पांडे
नागपूर : बांगलादेशमधीलहिंदू व इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली होती. मात्र, तरीदेखील अजूनही तेथील हिंदूंना टार्गेट केले जात असून, त्यांच्यात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनबांगलादेशमधील अत्याचाराविरोधात मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये या विषयाची चर्चा व्हावी आणि हिंदू-अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ‘ग्लोबल’ आवाज उचलला जावा, यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
शुक्रवारपासून बंगळुरू येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. या सभेत दोन प्रस्तावांवर सखोल मंथन होणार आहे. संघ स्थापनेच्या शतकवर्षानिमित्त या सभेला महत्त्व आले असून, या वर्षातील कार्यक्रमांच्या नियोजनावर, तर चर्चेला सुरुवात झालीच आहे. सोबतच बांगलादेशमधील परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहे. संघाकडून बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात अगोदरदेखील ठोस भूमिका मांडण्यात आली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सार्वजनिक मंचावरून याची निंदा केली होती. संघ स्वयंसेवकांनी शक्य त्या पद्धतीने तेथील हिंदू व अल्पसंख्याकांना मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर संघाकडून हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची तयारी सुरू झाली आहे. याचे नियोजन अखिल भारतीय प्रतिनीधी सभेत करण्यात येणार आहे. जागतिक समुदायाने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, अशी संघाची भूमिका आहे व त्यादृष्टीनेच आता पुढील पावले उचलण्यात येतील.
बांगलादेशमधील घटना ही मानवतेवर काळिमा
संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी बांगलादेशमध्ये सातत्याने सुरू असलेल्या हिंसाचाराची निंदा केली आहे. तेथील घटना सुसंस्कृत समाजातील मानवतेच्या आणि लोकशाहीच्या कोणत्याही मानकांनुसार लज्जास्पद आहेत. तेथील स्थिती अद्यापही गंभीर असून तेथील हिंदू व अल्पसंख्याकांनी या स्थितीतदेखील दाखविलेली हिंमत नक्कीच कौतुकास्पद आहे, अशी भूमिका संघाने मांडली आहे. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेने प्रयत्न करावे, असे आवाहन संघाकडून परत एकदा करण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये मैतेई-कुकींमध्ये ‘संवादसेतू’ साधणार
बांगलादेशसोबतच मणिपूरमधील हिंसाचाराबाबतदेखील संघाने चिंता व्यक्त केली आहे. तेथील विविध आदिवासी व जनजातीय समूहांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: मैतेई व कुकी समुदायाला एका मंचावर आणून त्यांच्यात संवादसेतू प्रस्थापित करण्यावर संघाकडून भर देण्यात येत आहे. दोन्ही समुदायांचे नेत्यांशी संघाचे अखिल भारतीय पातळीवरील अधिकारी संपर्कात आहेत. तसेच इंफाळ, गुवाहाटी व दिल्ली येथे बैठकादेखील झाल्या आहेत.