देशाच्या सीमांजवळील गावांच्या बळकटीसाठी संघ सरसावणार

By योगेश पांडे | Published: November 7, 2023 11:42 PM2023-11-07T23:42:02+5:302023-11-07T23:42:10+5:30

शिक्षण, आरोग्याबाबत राबविणार सेवा प्रकल्प : विविध उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर

RSS will mobilize for the strengthening of villages near the borders of the country | देशाच्या सीमांजवळील गावांच्या बळकटीसाठी संघ सरसावणार

देशाच्या सीमांजवळील गावांच्या बळकटीसाठी संघ सरसावणार

नागपूर : देशाच्या सीमाभागाजवळील गावांच्या बळकटीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. या गावांमध्ये शिक्षण, आरोग्य इत्यादी बाबींबाबध विविध सेवा प्रकल्प व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत जागृतीदेखील करण्यात येणार आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक गुजरातमधील भुज येथे पार पडली. त्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत यावर मंथन झाले.

मागील काही दशकांमध्ये सीमा भागातून अनेक नागरिकांनी देशाच्या इतर भागात स्थलांतर केले. स्थानिक लोकांना सीमा भागातील इत्थंभूत माहिती असते. तेथील परंपरा, संस्कृती यांच्यासोबतच तेथील सुरक्षेच्या मुद्यांवरदेखील त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. मात्र, बहुतांश सीमा भाग हा डोंगराळ किंवा वाळवंटाने वेढलेला आहे. तेथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिकांकडून स्थलांतर करण्यात येते. संघाकडून सीमा भागाच्या बळकटीकरणावर अनेकदा भाष्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारनेदेखील त्यादृष्टीने विविध पावले उचलली. याच शृंखलेत आता सीमा भागातील जनतेच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे.

संघ स्वयंसेवकांकडून सीमा जागरण मंच व सीमा जनकल्याण समितीच्या माध्यमातून या क्षेत्रांमध्ये काम करण्यात येते. तेथे जनतेचा विकास, आरोग्य, स्वावलंबन, शिक्षण इत्यादी बाबींवर विविध उपक्रम राबविण्यात येतील, तसेच सुरक्षायंत्रणांना सहकार्य व्हावे यासाठी जनतेमध्ये जागृती मोहीमदेखील सुरू करण्यात येईल. त्या भागांमधील धर्मपरिवर्तनावरदेखील लक्ष ठेवण्याबाबत संघाने नियोजन केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरहद प्रणामसारखे उपक्रम राबविणार
सीमा जनकल्याण समितीने काही काळाअगोदर सरहद प्रणाम नावाचा उपक्रम राबविला होता. सीमेवरील नागरिकांशी देशाच्या इतर भागांतील लोक जुळले पाहिजेत, हा त्यामागील उद्देश होता. त्या पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शाखापातळीवरील उपक्रमांत महिलांचा समावेश होणार
संघात महिलांना स्थान नाही, अशा आशयाची अनेकांकडून टीका होते. संघाच्या विविध उपक्रमांत महिलांचा सहभाग वाढविण्यावरदेखील अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. दर दोन महिन्यांनी शाखा पातळीवर स्वयंसेवक कुटुंब मिलनाचे आयोजन करण्यात येईल. त्या माध्यमातून तेथे महिला आल्यावर त्यांच्यासमवेत विविध सामाजिक मुद्यांवर चर्चा करत आवश्यक उपक्रम राबविण्यात येतील, तसेच संघ परिवारातील संघटनांच्या महिला सशक्तीकरणाच्या विविध प्रकल्पांमध्ये आणखी महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर असेल. देशपातळीवर पाचशेहून अधिक महिला सशक्तीकरण संमेलनेदेखील आयोजित करण्यात येतील.

Web Title: RSS will mobilize for the strengthening of villages near the borders of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.