आरटीईची प्रवेश प्रक्रिया ठप्प : पालकांच्या चिंतेत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:14 PM2020-05-25T20:14:48+5:302020-05-25T20:17:43+5:30
तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. दुसरीकडे खासगी शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित असतात. त्याअंतर्गत खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई लागू झाल्यापासून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या माध्यमातून विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र आरटीईतून दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने गेल्या वर्षीपासून आरटीईच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार घराच्या परिघापासून दीड किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा उपलब्ध नसेल तरच पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या शाळा व जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. यंदा २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यात ६८० शाळांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार ६,७८५ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या.
शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावेळी आरटीई प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षण खात्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेला चालना दिली तरी प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.