आरटीई : साडेपाच हजारावर बालकांना प्रवेश मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 10:05 PM2021-06-10T22:05:10+5:302021-06-10T22:05:45+5:30
RTE, Nagpur news शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील ५,६११ बालकांची ६८० शाळांमधून निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ३० जूनपर्यंत सुरुवात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील ५,६११ बालकांची ६८० शाळांमधून निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ३० जूनपर्यंत सुरुवात होणार आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांनी ११ ते ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.
आरटीई कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असली तरी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी प्रवेशासाठी शाळेत गर्दी टाळावी. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना सोबत नेऊ नये. शाळेकडून प्रवेशाची तारीख अर्जात नमूद मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील ॲप्लीकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून प्रवेशाची तारीख पाहावी.
पालकांनी प्रवेशासाठी एसएमएस प्राप्त सूचनेनंतर शाळेत जावे. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती तसेच पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती ॲप्लीकेशन वाईज डिटेल्स आणि अलॉटमेंट लेटरची प्रत सोबत नेणे आवश्यक आहे.
भिवापूर तालुक्यात पाच शाळांसाठी ४०, तर हिंगणा तालुक्यात ४१ शाळांसाठी ३९३, कळमेश्वर तालुक्यात २६ शाळांसाठी ११८, कामठी तालुक्यात ४० शाळांसाठी ३९१, काटोल तालुक्यात १९ शाळांसाठी १६४, कुही तालुक्यात १५ शाळांसाठी ९९, मौदा तालुक्यात १९ शाळांसाठी १७२, नागपूर ग्रामीणमध्ये १०२ शाळांसाठी ९०८, नरखेड तालुक्यात १४ शाळांसाठी ११४, पारशिवनी तालुक्यात १७ शाळांसाठी ११२, रामटेक तालुक्यात १३ शाळांसाठी १२७, सावनेर तालुक्यात ३४ शाळांसाठी २२४, उमरेड तालुक्यात २४ साठी २२२ अशा पद्धतीने बालकांची निवड झाली आहे. शहरी भागातील यूआरसी १ मध्ये २७२ शाळांसाठी १,८४८ तर यूआरसी २ मध्ये ३९ शाळांसाठी ६७९ बालकांची निवड झाली आहे.
शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क असून, राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षण देण्यात येण्याची तरतूद आहे. प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क या कायद्याने मिळणार आहे.
शाळेत प्रवेश घेताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.