‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय; प्रात्यक्षिक ‘ऑफलाईन’, ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 03:39 PM2022-04-22T15:39:24+5:302022-04-22T15:45:43+5:30
परीक्षा मंडळाच्या बैठकीत गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून होतील व ‘थिअरी’च्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार आहेत.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑफलाईन’ उन्हाळी परीक्षांची तयारी जवळपास पूर्ण झाली असताना ‘ऑनलाईन’च्या मागणीने जोर धरला होता. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने ‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून होतील व ‘थिअरी’च्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार आहेत.
विद्यापीठाने कोरोनामुळे दोन वर्षे ‘ऑनलाईन’ परीक्षाच घेतल्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील हिवाळी परीक्षादेखील ‘ऑनलाईन’ झाल्या. मात्र, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर विद्यापीठानेदेखील ‘ऑफलाईन’ परीक्षांची तयारी केली. मात्र जर अर्धे वर्ग ‘ऑनलाईन’ माध्यमातून झाले आहेत, तर मग परीक्षा ‘ऑफलाईन’ का? असा सवाल उपस्थित करत विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेता विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले नव्हते. परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली व ‘मिक्स मोड’चा निर्णय झाला. ज्या अभ्यासक्रमांना प्रात्यक्षिक आहेत, ते सर्व ‘ऑफलाईन’ माध्यमातूनच होतील. तर सर्व लेखी परीक्षा ‘ऑनलाईन’ होतील. यात बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील.
‘ऑनलाईन’ परीक्षा हुकली तर ‘ऑफलाईन’ची संधी
विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा दोन्ही परीक्षांचा पर्याय देण्यात येणार आहे. जर विद्यार्थ्यांची तांत्रिक कारणांमुळे ‘ऑनलाईन’ परीक्षा हुकली, तर त्यांची ‘ऑफलाईन’ परीक्षा घेण्यात येईल. त्यांना परीक्षा केंद्र त्यांच्याच महाविद्यालयात देण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
परीक्षा १५ मे नंतर
मागील दोन वर्षांत विद्यापीठाने ‘ऑनलाईन’ परीक्षांसाठी प्रश्नांची ‘बँक’च तयार करून ठेवली आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन’ परीक्षांसाठी ‘मॉडरेशन’चेच काम करावे लागणार आहे. यात जास्त वेळ लागणार नाही. शिवाय ‘ऑफलाईन’साठी प्रश्नपत्रिका तयार आहेत. सर्वसाधारणत: १५ मे नंतर उन्हाळी परीक्षांना सुरुवात होईल, अशी शक्यता आहे.
परत होणार गुणांची बरसात ?
मागील दोन वर्षे ‘ऑनलाईन’ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांचा ‘ऑनलाईन’साठीच आग्रह होता. आता परत ‘ऑनलाईन’ परीक्षा होणार असल्याने गुणांची बरसात होईल, अशी विद्यार्थ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. ‘ऑनलाईन’ परीक्षा हुकलेल्यांना ‘ऑफलाईन’ परीक्षा द्यावी लागणार आहे. दोन्ही निकालांमध्ये तफावत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या व योग्य इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या विद्यार्थ्यांसमोर आव्हान राहणार आहे.