म्हणे स्वामी विवेकानंदांची जयंती ११ सप्टेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:22 PM2018-09-05T12:22:21+5:302018-09-05T12:28:16+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वाद यांचे एक अनोखे समीकरण आहे. अनेकदा विद्यापीठाच्या निर्णयांवरून वाद होतात. मात्र आता तर विद्यापीठाने स्वत:च वादात उडी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वाद यांचे एक अनोखे समीकरण आहे. अनेकदा विद्यापीठाच्या निर्णयांवरून वाद होतात. मात्र आता तर विद्यापीठाने स्वत:च वादात उडी घेतली आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र नागपूर विद्यापीठाने चक्क ११ सप्टेंबर ही स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्याचा शोध लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यासंदर्भातील अधिकृत पत्रदेखील सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहेत.
११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक धर्मसंसदेत ऐतिहासिक भाषण केले होते व भारताची ख्याती जगभरात गेली होती. या भाषणाला सव्वाशे वर्ष होत असल्यामुळे देशभरातील अनेक ठिकाणी हा दिवस दिग्विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद हे युवावर्गाचे आदर्श आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठातदेखील हा दिवस साजरा व्हायला पाहिजे, असा प्रस्ताव डॉ. निरंजन देशकर यांनी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडला होता व परिषदेने याला संमती दिली होती.
त्यानुसार विद्यापीठाने परिपत्रक जारी केले व हा दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग, संचालित महाविद्यालये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयांना विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिलीप कावडकर यांनी पत्रदेखील पाठविले. यादिवशी विवेकानंद यांच्या त्या भाषणाचे वाचन करण्यात येणार आहे. मात्र या पत्रानेच सर्व घोळ केला. ११ सप्टेंबर २०१८ रोजी स्वामी विवेकानंद यांची १२५ वी जयंती विभाग व महाविद्यालयात ‘दिग्विजय दिवस’ म्हणून साजरी करण्यात यावी, असे या पत्रात नमूद आहे.
महाविद्यालयांकडून आश्चर्य, विद्यार्थी संघटनांचे मौन
नागपूर विद्यापीठाने इतकी मोठी घोडचूक केल्यामुळे महाविद्यालयांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारे पत्र पाठविणे हे प्रशासनाचा अभ्यास नसल्याचे दर्शवित आहे, अशी भावना एका प्राचार्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे विद्यार्थी संघटनांनीदेखील या जावईशोधावर मौन बाळगले आहे.