एका महिन्यात पाचव्यांदा रद्द झाली विद्यापीठाची परीक्षा; पेपरच्या आदल्या रात्री घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 10:38 AM2022-09-01T10:38:03+5:302022-09-01T10:46:51+5:30
परीक्षा रद्द करण्यामागे तांत्रिक कारण दिले जात आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यापरीक्षा विभागाने उन्हाळी परीक्षांतर्गत अनेक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षा रद्द करण्याची ही पाचवी वेळ आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी परीक्षेच्या एक दिवस आधी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे निर्णयाची माहिती दिली. परीक्षा रद्द करण्यामागे तांत्रिक कारण दिले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतेच राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाला एमकेसीएलकडून परीक्षा कार्य काढून प्राेमार्क कंपनीला ते देण्याचे आदेश दिले हाेते. या आदेशानंतर विद्यापीठाने प्राेमार्क कंपनीला परीक्षेची जबाबदारी साेपविली. डाटा ट्रान्सफर प्रक्रियेत उशीर लागत असल्याने परीक्षा विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत डाॅ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.
विद्यापीठाकडून सातत्याने परीक्षा रद्द केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून जावे लागत आहे. हा पेपर आधी १० ऑगस्टला हाेणार हाेता पण नंतर स्थगित करण्यात आला. यानंतर पुन्हा १६ ते २१ ऑगस्टदरम्यान परीक्षा हाेणार हाेती पण यावेळीही तांत्रिक कारण देत पेपर रद्द करून २७ ऑगस्टला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तरी पेपर हाेईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना हाेती पण तसे झाले नाही. परीक्षेच्या एक दिवसआधी पेपर रद्द करण्याची घाेषणा करण्यात आली. परीक्षा विभागाने अधिसूचना काढत पाेळा सणामुळे पेपर रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर हा पेपर ३० ऑगस्टला हाेणार हाेता.
यापूर्वीच्या बेजबाबदारपणाचे कारण
विद्यापीठाचा परीक्षा विभाग सुरुवातीपासूनच उन्हाळी परीक्षेबाबत चालढकलपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेतली जात असून वेळापत्रक तयार करतानाच दुर्लक्षितपणा केला जात आहे. यामुळेच परीक्षा सुरू झाल्यानंतर अनेक विषयांचे पेपर रद्द करावे लागत आहेत.