नागपूर विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरण; धवनकरांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. करणाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 01:08 PM2022-11-18T13:08:46+5:302022-11-18T13:11:05+5:30
प्रकरण उकरून काढण्यासाठी परीक्षा विभाग कामाला
नागपूर : विभागप्रमुखांना लैंगिक तक्रारींची भीती दाखवून खंडणी वसूल करण्याचा आराेप असलेले राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक डाॅ. धर्मेश धवनकर आता नव्या प्रकरणाच्या गर्तेत फसत आहेत. धवनकरांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत किती आणि कुणीकुणी पीएच.डी. केली, याचे संपूर्ण रेकाॅर्ड उकरून काढला जात आहे. काेणत्या राज्याच्या किती संशाेधनकर्त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. केली, याचा इतिहासही धुंडाळला जात आहे.
विद्यापीठाचा परीक्षा विभाग या कामाला लागला आहे. धवनकरांच्या मार्गदर्शनात पीएच.डी.प्राप्त केलेल्या परराज्यातील सहा संशाेधनकर्त्यांच्या पत्त्यावरून संशय वाढला हाेता. त्यांचे दस्तऐवजही शाेधले जात आहेत. त्यांचा मूळ रहिवास कुठला आहे, पीएच.डी.साठी अर्ज करताना त्यांनी कुठला पत्ता दिला हाेता, त्यांनी केलेल्या शाेधकार्याचा विषय काय हाेता, त्याचे मूल्यांकन कुणी केले, एकाच मूल्यांकनकर्त्याकडे अनेकांचे शाेधकार्य देण्यात आले काय, अशा अनेक प्रश्नांना घेऊन चाैकशी केली जात आहे. त्यासाठी सर्वांच्या शाेधप्रबंधांची चाैकशी केली जात असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण रेकाॅर्डच्या दाेन फाइल्स तयार केल्या जाणार आहेत, ज्यामुळे पीएच.डी.शी संबंधित संपूर्ण प्रकरणाचे सत्य बाहेर येईल. दरम्यान, परीक्षा विभागाने स्वत:ही चाैकशी सुरू केली की विद्यापीठ कुलगुरू कार्यालयाकडून तसे आदेश प्राप्त झाले, याबाबत काही स्पष्ट नाही.
सूत्राच्या माहितीनुसार ज्याप्रमाणे डाॅ. धवनकरांचे प्रकरण समाेर आले आणि ज्या पद्धतीने आराेप लावले जात आहेत, हे पाहता परीक्षा विभागाने स्वत:च दस्तऐवज तपासणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पुढे विद्यापीठ प्रशासनाकडून आदेश आला की त्यांच्यासमाेर तत्काळ चाैकशी अहवाल ठेवला जाईल. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांच्या माहिती घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
उल्लेखनीय म्हणजे विद्यापीठाच्या सात विभागप्रमुखांनी धवनकरांवर लैंगिक तक्रारीची भीती दाखवून लाखाेंची खंडणी वसूल केल्याचा आराेप केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर पीएच.डी. करणाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आणि परराज्यातील शाेधकर्त्यांनी मूळ पत्ता देण्याऐवजी धवनकरांच्या घराचा पत्ता दिला असल्याने संशय बळावला आहे. नियमानुसार पीएच.डी.चा अर्ज करणाऱ्या शाेधकर्त्यांना त्या काळात नागपुरात राहणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शाेधकर्ता एकही दिवस नागपुरात राहिले नाहीत. या आराेपांमुळे परीक्षा विभाग सतर्क झाल्याचे सूत्रांकडून बाेलले जात आहे.