नागपूर विद्यापीठाला पूराचा फटका, लाखो रुपयांचा कागद पाण्यात
By जितेंद्र ढवळे | Published: September 26, 2023 05:12 PM2023-09-26T17:12:39+5:302023-09-26T17:13:35+5:30
मुद्रणालयाच्या बेसमेंटमध्ये अद्यापही ८ फूट पाणी
नागपूर : नागपुरात शनिवारी आलेल्या पुराचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालाही बसला आहे. विद्यापीठाच्या महाराज बाग स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात असलेल्या मुद्रणालयातील बेसमेंटमधील गोदामात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने येथील लाखो रुपयांचे प्रिटिंग मेटेरिअयल आणि कागद पाण्यात भिजला आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात पुरजन्यस्थिती निर्माण झाली होती. यातच महाराजबाग परिसरातील विद्यापीठाचे मुद्रणालयातील बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. अद्यापही येथे ८ फूटापर्यंत पाणी आहे. मुद्रणालयाच्या गोदामधील १३९२ पेपरचे रिम आणि प्रिंटीगसाठी लागणारे महत्वाचे साहित्य पाण्यात भिजले आहे. यात अंदाजे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विद्यापीठाचे प्रकाशन अधिकारी प्रवीण गोतमारे यांनी दिली.
महापालिकेच्या अग्निशमन आणि संबंधित विमा कंपनीला याबाबत माहिती दिल्याचे गोतमारे यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी मुद्रणालयात झालेल्या नुकसानीही पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.