नागपूरसाठी नव्या वर्षाचा पहिला आठवडा 'विज्ञान परमो धर्म:' चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:02 PM2022-12-28T13:02:39+5:302022-12-28T14:04:57+5:30
शताब्दी वर्षात विद्यापीठाला १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद RTM Nagpur university gets a chance to organaise indian science congress
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धम्मपरिवर्तनासाठी निवडलेले शहर यांसह देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूरचा नव्या वर्षाचा पहिला आठवडा विज्ञान परमो धर्म: वातावरणाचा असेल. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तब्बल ४८ वर्षांनंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद लाभले असून या १०८ व्या सायन्स काँग्रेसमध्ये रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी मंगळवारी संपादकांशी बोलताना दिली.
याआधी १९७४ साली ६१ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद नागपूर विद्यापीठाने भूषविले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्या काँग्रेसचे उद्घाटन झाले होते. विज्ञानाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेली ही परिषद १९१४ साली सुरू झाली. त्यानंतर १९२० साली सातवी, १९३१ साली अठरावी, तसेच १९४५ साली ३२ वी सायन्स काँग्रेस नागपूरमध्ये पार पडली. आता या आयोजनाचे स्वरूप अतिभव्य झाले असून १०८ व्या काँग्रेसमध्ये शंभरावर मुख्य व्याख्याने व चारशेवर इतर व्याख्याने होतील. शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व त्याद्वारे महिला सबलीकरण अशी या आयोजनाची थीम आहे. ३ ते ७ जानेवारीपर्यंत आयोजित या सायन्स काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. याप्रसंगी २००९ मधील नोबेल पुरस्कार विजेते क्रिस्टलोग्राफर अडा ई. योनाथ (इजराईल) व २०१६ मधील नोबेल पुरस्कार विजेते सर फ्रेजर स्टॉडार्ट (ब्रिटन) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सायन्स काँग्रेसची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
सायन्स काँग्रेसची व्यापकता
१ - सायन्स काँग्रेसमध्ये १० ते १२ हजार प्रतिनिधी सहभागी होतील. त्यात १०० पेक्षा जास्त वक्ते व तज्ज्ञ राहतील.
२ - सायन्स काँग्रेसमध्ये ३ हजारापेक्षा जास्त पेपर प्रेझेंटेशन केले जातील. सुमारे १०० संशोधक मार्गदर्शन करतील.
३ - ५०० पेक्षा जास्त आदिवासी प्रतिनिधी व एक हजारावर शेतकरीही सायन्स काँग्रेसमध्ये उपस्थित होतील.