नागपूर विद्यापीठाला ४८ वर्षांनंतर मिळाले इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 12:30 PM2022-07-07T12:30:01+5:302022-07-07T12:34:17+5:30
येत्या ११ जुलै रोजी इंडियन सायन्स काँग्रेसचे एक पथक विद्यापीठाच्या दौऱ्यावर येणार आहे. यात आयोजनासंदर्भात आवश्यक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
नागपूर : तब्बल १६ वर्षांच्या प्रयत्नांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. ३ जानेवारी २०२३ रोजी याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी येत्या ११ जुलै रोजी इंडियन सायन्स काँग्रेसचे एक पथक विद्यापीठाच्या दौऱ्यावर येणार आहे. यात आयोजनासंदर्भात आवश्यक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाला दुसऱ्यांदा ही जबाबदारी मिळणार आहे. यापूर्वी विद्यापीठाला १९७४ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद मिळाले होते. गेल्या १६ वर्षांपासून विद्यापीठ यजमानपद मिळवण्यासाठी प्रयत्नरत होते. २००६ मध्ये विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी यजमानपदासाठी दावा केला होता; परंतु तो मंजूर झाला नाही. त्यानंतरही प्रयत्न सुरूच होते.
सूत्रानुसार, काही महिन्यांपूर्वी इंडियन सायन्स काँग्रेसच्या यजमानपदासाठी अर्ज करण्यात आला होता. यात म्हटले हाेते की, विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे यंदाचे यजमानपद देण्यात यावे. सूत्रानुसार, राजकीय स्तरावरही विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात आले होते.
आयोजन आव्हानात्मक
इंडियन सायन्स काँग्रेससारख्या मोठ्या समारंभाचे आयोजन करणे विद्यापीठासाठी मोठे आव्हानात्मक काम आहे. कारण विद्यापीठाकडे आवश्यक साधन सुविधा नाही. यात देश-विदेशातील तब्बल २० हजारांवर वैज्ञानिक व प्रतिनिधी सहभागी होतील. इतक्या लोकांची राहण्याची व्यवस्था करणे कठीण काम आहे. विद्यापीठाला सर्व तयारीसाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. सूत्रानुसार, यापूर्वीही विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्ये आयोजनाबद्दल चर्चा झाली होती. या समारंभात येणाऱ्यांना कुठे थांबवायचे, याबाबत बरीच चर्चा झाली. तेव्हा शहरातील हॉटेल बुक करण्याचा सल्ला देण्यात आला; परंतु शहरात इतके हॉटेल आणि २० हजार खोल्या उपलब्ध होतील का? हा प्रश्न आहे.
पथकाला सांगावे लागणार आयोजन कसे होणार ?
सूत्रानुसार, ११ जुलै रोजी निरीक्षणासाठी विद्यापीठात पथक येणार आहे. विद्यापीठ आयोजन कसे करेल, कुठे-कुठे कार्यक्रम होतील. येणाऱ्या वैज्ञानिकांना व अतिथींना कुठे थांबवले जाईल, त्यांना कोणकाेणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातील, या सर्वांची माहिती पथक विद्यापीठाकडून जाणून घेईल.