नागपूर विद्यापीठ करणार उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुरस्कृत
By आनंद डेकाटे | Published: July 3, 2023 01:31 PM2023-07-03T13:31:45+5:302023-07-03T13:32:24+5:30
५ जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना सादर करता येणार अर्ज
नागपूर : विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराकरिता विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहे. बुधवार ५ जुलै पर्यंत अर्ज पाठविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहेत.
विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट छात्रसेना कॅडेट आणि उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू असे पुरस्कार दिले जाणार आहे. या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांकडून ३० जून पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु आता अर्ज स्वीकारण्यास ५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याला तीनही पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. प्रत्येक पुरस्काराकरिता वेगवेगळे आवेदन पत्र सादर करावे लागणार आहे. या पुरस्कारा बाबतचे नियम अर्ज बरोबर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावर देखील अर्ज आणि नियम उपलब्ध आहेत.
या पुरस्कारांच्या अर्जासह विभाग प्रमुख, प्राचार्य किंवा संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र जोडावे लागणार आहे. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही. विद्यापीठाच्या सर्व विभागांनी तसेच संलग्न महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना या पुरस्काराबाबत माहिती द्यावी असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर मंगेश पाठक यांनी केले आहे.