विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी केंद्रित व काैशल्यपूर्ण व्हावे - राज्यपाल रमेश बैस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:24 AM2023-04-14T11:24:11+5:302023-04-14T11:28:56+5:30
नागपूर विद्यापीठाच्या ११०व्या दीक्षांत साेहळ्यात प्रतिपादन
नागपूर : राज्यातील विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याच्या आणि इतरही तक्रारी येतात. या विलंबामुळे विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठात प्रवेशासाेबत अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या गरजांबाबत संवेदनशील असायला हवे. विद्यापीठाचे प्रशासन विद्यार्थी केंद्रित, सहायक व काैशल्यपूर्ण असायला हवे, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल व कुलपती रमेश बैस यांनी केल्या. शिक्षकांच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांनी रचनात्मक समाधान शाेधावे तसेच उद्याेग आणि संशाेधनाशी संबंधित लाेकांना विद्यापीठांशी जाेडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वसंतराव देशपांडे सभागृहात आयाेजित राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११०व्या दीक्षांत समाराेहात ते बाेलत हाेते. याप्रसंगी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, कुलगुरू सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपाल बैस यांनी सायबर गुन्हेगारी ही या काळातील गंभीर समस्या असल्याचे सांगत महाविद्यालये आणि विद्यापीठांनी सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी व विद्यार्थ्यांनी सायबर याेद्धा व्हावे, असे आवाहन केले. भारत हा २९ वर्षे सरासरी वय असलेल्या तरुणांचा देश आहे. आज अनेक देश वार्धक्याच्या समस्येने ग्रस्त असून, काैशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी ते भारताकडे आशेने पाहत आहेत. अशावेळी महाराष्ट्रासारखे राज्य जगातील देशांची काैशल्याची गरज भागवू शकताे. त्यामुळे आपल्या पदवीधरांनी काैशल्याने सज्ज व्हावे. नुकतेच राज्यात महाराष्ट्र काैशल्य विद्यापीठाची स्थापना झाली आहे.
नागपूर विद्यापीठाने या विद्यापीठाशी समन्वय करून काैशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करावे. राज्यातील अनेक विद्यापीठे परदेशी विद्यापीठांशी करार करून शिक्षण देत आहेत. नागपूर विद्यापीठानेही ते करावे व संयुक्त पदवीला चालना द्यावी. आपल्या देशात हलक्या कामाला प्रतिष्ठा नसल्याने पदवीधर बेराेजगार राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवे शैक्षणिक धोरण आधुनिक शिक्षण युगाचा प्रारंभ ठरेल. संशोधक व प्रोफेशनल्सची पिढी तयार होईल. त्याद्वारे देशाला आपल्या राष्ट्रीय आकांक्षांना अनुरूप विकासाची उंची गाठता येईल. ज्ञानार्जन हा धर्म आणि विद्यापीठ हे तीर्थक्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
भारताला शैक्षणिक नेतृत्व करण्याची संधी - सीताराम
आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात राहत असून, जग वेगाने बदलत आहे. संशाेधनाने जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पाडला आहे. शिक्षण क्षेत्र वेगळे नाही. नवे शैक्षणिक धाेरण २०२०च्या अंमलबजावणीने उच्च शिक्षणात क्रांती घडू शकते. ‘एआयसीटीई’ व ‘युजीसी’ सारख्या संस्था त्यानुसार पावले टाकत आहेत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारखे उपक्रम नव्या भारताला चालना देत आहेत. भारत माहिती तंत्रज्ञानात लिडर आहे आणि शैक्षणिक क्षेत्रातही नेतृत्व करण्याची संधी आहे, असा विश्वास सीताराम यांनी व्यक्त केला.