आता बोलणाऱ्या फुलपाखरांकडून जाणून घ्या रंगीबेरंगी जैवविविधता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 05:03 PM2022-01-28T17:03:07+5:302022-01-28T17:16:23+5:30
प्रत्येक फुलपाखराचा वैज्ञानिक तपशील विद्यार्थ्यांना आणि निसर्गप्रेमींना सहज लक्षात यावा यासाठी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातर्फे ‘आय एम बटरफ्लाय’ या नावाने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया ही लहानांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मोहून टाकणारी असते. या जैवविविधतेतील तथ्य जर फुलपाखरांच्या तोंडूनच ऐकायला मिळाले तर क्या कहने ! सबकुछ ऑनलाईनच्या युगात आता फुलपाखरांचे वैज्ञानिक तपशील रंजकपणे विद्यार्थी व निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचावेत यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. विभागातील प्राध्यापकांनी विशेष ॲप व डिजिटल हॅंडबुक विकसित केले असून या माध्यमातून पुस्तकांमधील ज्ञान अगदी सहजपणे समजेल अशी रचना केली आहे.
नागपूर विद्यापीठातील कॅम्पसमध्ये हिरवळ असून वर्षभर तेथे फुलपाखरांचा वावर असतो. याच फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती ई-माध्यमातून संकलित करण्यासाठी डॉ. दीपक बारसागडे, डॉ. सारंग धोटे आणि डॉ. नितीशा पाटणकर यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी कॅम्पसमधील फुलपाखरांच्या ४६ विविध प्रजातींची नोंद केली. प्रत्येक फुलपाखराचा वैज्ञानिक तपशील विद्यार्थ्यांना आणि निसर्गप्रेमींना सहज लक्षात यावा यासाठी ‘आय एम बटरफ्लाय’ या नावाने मोबाईल ॲप विकसित केले. सोबतच प्रत्येक फुलपाखरासाठी स्वतंत्र क्यूआर कोड असलेले डिजिटल हँडबुकदेखील तयार करण्यात आले. हे ॲप मोफत उपलब्ध असून इंटरनेटच्या वापराविना त्याचा उपयोग करता येऊ शकतो. या ॲपमध्ये फुलपाखरांची माहिती इंग्रजी, मराठी व हिंदी अशा तिनही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
प्रत्येक पानावर क्यूआर कोड
या ॲपसाठी एक डिजिटल पॉकेट पुस्तक तयार करण्यात आले असून त्याच्या प्रत्येक पानावर फुलपाखरांचे क्यूआर कोड असलेले स्वतंत्र चित्र दिले आहे. दिलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, फुलपाखरांची संपूर्ण शास्त्रीय माहिती ऐकू येते.
कुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन
बोलणाऱ्या फुलपाखरांच्या या ॲपचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, प्रा. धर्मेश धवनकर, प्रा. वर्षा धुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.