‘प्राईड ऑफ इंडिया’मध्ये दिसेल विज्ञान-तंत्रज्ञानातील भारताचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:26 AM2023-01-02T11:26:59+5:302023-01-02T11:28:58+5:30
१०८ वे इंडियन सायन्स काॅंग्रेस : पंतप्रधान नरेंद्र माेदी करणार उद्घाटन
नागपूर : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आतापर्यंत मिळविलेले यश, समाजासाठी दिलेले याेगदान आणि संपूर्ण जगाच्या कॅनव्हासवर भारतीय वैज्ञानिकांनी केलेली कामगिरी १०८ व्या इंडियन सायन्स काॅंग्रेसच्या आयाेजनात बघायला मिळणार आहे. शेकडो नवीन कल्पना, नवकल्पना आणि उत्पादने एकत्रितपणे ‘प्राईड ऑफ इंडिया’ या विशेष प्रदर्शनातून अभिमानास्पद यश बघायला मिळणार आहे. सरकार, कॉर्पोरेट, सार्वजनिक उपक्रम, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, इनोव्हेटर्स आणि देशभरातील उद्योजक त्यात सहभागी हाेतील.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय परिसरात येत्या ३ जानेवारी राेजी १०८ व्या इंडियन सायन्स काॅंग्रेसला सुरुवात हाेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी हे आयाेजनाचे उद्घाटन करतील. त्यात केंद्रीय मंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल सहभागी हाेणार आहेत. आयाेजनात तांत्रिक सत्र १४ विभागांमध्ये विभागण्यात आले आहे. महात्मा ज्याेतिबा फुले शैक्षणिक कॅम्पस परिसरातील वेगवेगळ्या स्थळी आयाेजन हाेईल. त्यामध्ये वुमन सायन्स काॅंग्रेस, फार्मर्स सायन्स काॅंग्रेस, चिल्ड्रेन्स सायन्स काॅंग्रेस, आदिवासी परिषद, विज्ञान आणि समाज, विज्ञान कम्युनिकेटर्स काॅंग्रेस आदी विभागांचे सत्र हाेतील. अंतराळ, संरक्षण, आयटी, मेडिकल रिसर्च अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील भारतीय आणि परदेशातील संशाेधक, वैज्ञानिक, तज्ज्ञ, तंत्रज्ञ या सत्रांमध्ये मार्गदर्शन करतील.
कृषी, वनविज्ञान, पशु व मत्स्य विज्ञान, मानववंश शास्त्र आणि वर्तणूक विज्ञान, रासायनिक विज्ञान, पृथ्वी प्रणाली विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, माहिती आणि संप्रेषण विज्ञान, तंत्रज्ञान, भौतिक विज्ञान, गणित विज्ञान, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, भौतिक विज्ञान आणि वनस्पती विज्ञान अशा शाखांवर सखाेल ऊहापाेह या आयाेजनात हाेईल.
विज्ञान ज्याेत निघाली
इंडियन सायन्स काॅंग्रेसअंतर्गत रविवारी झिराे माईलस्टाेन ते विद्यापीठ कॅम्पसपर्यंत ‘विज्ञान ज्याेत-फ्लेम ऑफ नाॅलेज’ काढण्यात आली. आयसीएसएच्या महाअध्यक्ष डाॅ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी विज्ञान ज्याेतीचे नेतृत्व केले. यावेळी शाळा महाविद्यालयाचे ४०० च्या विद्यार्थी सहभागी झाले हाेते. सायन्स काॅंग्रेसच्या संकल्पनेवर आधारित विशेष कॅम्प आणि टी-शर्ट या विद्यार्थ्यांनी परिधान केले हाेते. विद्यापीठ कॅम्पसमध्ये ही विज्ञान ज्याेत प्रकाशित करण्यात आली असून ७ जानेवारीला सायन्स काॅंग्रेसच्या समाराेपापर्यंत ती जळत राहणार आहे.