नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांवर पुढील वर्षापासून विद्यार्थ्याचे छायाचित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:48 AM2017-11-02T11:48:52+5:302017-11-02T11:53:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये पुढील वर्षीपासून आमूलाग्र बदलाची शक्यता आहे. पदवीवर विद्यार्थ्यांचे छायाचित्रदेखील असावे, यासंदर्भात विद्यापीठाचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये पुढील वर्षीपासून आमूलाग्र बदलाची शक्यता आहे. पदवीवर विद्यार्थ्यांचे छायाचित्रदेखील असावे, यासंदर्भात विद्यापीठाचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. देशभरात ‘बोगस’ पदव्यांची विविध प्रकरणे समोर येत असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने पदव्यांना सुरक्षित करण्यासंदर्भात निर्देश जारी केले होते, हे विशेष.
शैक्षणिक क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ‘ई-रिफॉर्म्स’ होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवी प्रमाणपत्रांसह विविध प्रमाणपत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. काही विद्यापीठांनी पदवीवर ‘क्यू.आर.कोड’ वापरण्यासदेखील सुरुवात केली. मात्र सोबतच तंत्रज्ञानाचाच उपयोग करून गैरप्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळेच प्रमाणपत्र, गुणपत्रिका व पदवीची सुरक्षितता याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ.जसपाल संधू यांनी निर्देश जारी केले होते. यानुसार विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी प्रमाणपत्रांवर त्यांचे छायाचित्र आणि आधार क्रमांक नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील पदवीच्या प्रारुपात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ साली परीक्षा मंडळाने संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यानुसार पदवीवर विद्यार्थ्यांचे छायाचित्र व स्वाक्षरीचा समावेश होणार होता. सोबतच इतरही ‘स्मार्ट फिचर’ समाविष्ट होणार होते. मात्र काही कारणांमुळे ही बाब पूर्णत्वास येऊ शकली नाही. २०१८ ला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांच्या पदव्यांमध्ये हा बदल दिसू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांची छायाचित्रे पदवीवर देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे मान्य केले. या वर्षी हे करणे शक्य नाही. कारण पदवी प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे व वेळ कमी आहे. शिवाय पदवीवर विद्यार्थ्यांचे नेमके कुठले छायाचित्र असेल याबाबतदेखील निर्णय घ्यावा लागणार आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात नामांकन नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्यांची छायाचित्रे घेतली जातात. मात्र अंतिम वर्षापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये बदल होतो. त्यामुळे याबाबत निर्णय घेऊन पुढील वर्षीपासून याची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.