कुलगुरूंना पडला आश्वासनाचा विसर, विद्यापीठ सिनेट सदस्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 11:24 AM2022-04-13T11:24:07+5:302022-04-13T11:31:56+5:30
जोपर्यंत सिनेटची बैठक होणार नाही तोपर्यंत नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीची बी फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचा शेरा स्मरणपत्रावर लिहून देण्यात आला. कुलगुरूंच्या भूमिकेवरून सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची बैठक केवळ दोन मिनिटांत विसर्जित करण्यात आली व सदस्यांनी आक्रमक पवित्र्यानंतर ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिले होते; परंतु कुलगुरूंना आश्वासनाचा विसर पडला असून जाणूनबुजून हा प्रकार होत असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे. ही अखेरची सिनेट बैठक ठरणार असल्याने प्रशासनाला ती होऊ द्यायची नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
२१ मार्च रोजी कुलगुरूंना केवळ दोनच मिनिटात सिनेटची बैठक विसर्जित केली होती. सदस्यांच्या आक्रमकतेनंतर एप्रिलमध्ये ती घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही याबाबत निश्चिती झालेली नाही. याबाबत सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना स्मरणपत्र दिले. त्यावर संबंधित बाब मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहे. जोपर्यंत सिनेटची बैठक होणार नाही तोपर्यंत नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीची बी फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचा शेरा स्मरणपत्रावर लिहून देण्यात आला. कुलगुरूंच्या भूमिकेवरून सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कुलगुरूंनी निवडणूक प्रक्रिया सिनेटशिवाय करणार नाही, असे म्हटले होते; परंतु त्यांनी फक्त बी फॉर्मची प्रक्रियाच नमूद केली आहे. कुलगुरूंनी वारंवार सिनेट सदस्यांना दिलेले आश्वासन खोटे ठरले आहे. अगोदर सभा दोन मिनिटात गुंडाळली व नंतर ४/५ एप्रिलला तहकूब सभा घेतो म्हणून आंदोलन स्थगित करायला लावले. सिनेटला प्राधान्य म्हणून निवडणूक प्रक्रिया घेणार नाही, असे म्हटले. मात्र, केवळ बी फॉर्मची प्रक्रिया थांबवत ते आश्वासनदेखील फिरविले असल्याचा आरोप सिनेट सदस्य विष्णू चांगदे यांनी लावला.
ऑडिओ रेकॉर्डिंग कधी मिळणार?
काही सदस्यांनी कुलगुरूंकडे सिनेटच्या दोन मिनिटांच्या बैठकीची ऑडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली होती. मात्र, ते रेकॉर्डिंग अद्यापही सदस्यांना पुरविण्यात आलेले नाही. दोन मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग देण्यासाठी विद्यापीठाला तीन आठवड्यांहून अधिक कालावधी कसा काय लागतो, असा सवाल चांगदे यांनी केला आहे.