नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पुन्हा वादात; राजीनाम्याच्या मागणीला जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:55 PM2023-01-10T14:55:07+5:302023-01-10T17:08:39+5:30
बाजपेयींचे सिनेट सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश फिरवला : कायदा माहिती नसल्याचे आराेप
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूरविद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी पुन्हा एका वादात सापडले आहेत. कुलगुरूंनी आधी एका सिनेटरला अयाेग्य ठरवून सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला, पण काही दिवसांनी आपलाच आदेश मागे घेतला. यावरून संबंधित सदस्यांनी कुलगुरूंनी सशर्त माफी मागावी किंवा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
ॲड. मनमाेहन बाजपेयी यांनी याप्रकरणी कुलगुरूंवर आराेप केले आहेत. त्यांनी सांगितले, १२ ऑगस्टला विद्यापीठाकडून त्यांचे सिनेट सदस्यत्व अयाेग्य असल्याचे पत्र पाठविण्यात आले. याविराेधात ॲड. बाजपेयी यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने कुलगुरूंना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले हाेते. यादरम्यान ८ जानेवारीला ॲड. बाजपेयी यांना विद्यापीठाकडून दुसरे पत्र आले, ज्यात त्यांचे सिनेट सदस्यत्व अयाेग्य ठरविल्याचा आदेश मागे घेतल्याचे सांगण्यात आले. या पत्रामध्ये ‘सिनेट सदस्याला अयाेग्य ठरविण्याचे अधिकार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६नुसार कुलपतींना आहेत व त्यामुळे सदस्यत्व अयाेग्य ठरविल्याचा आदेश मागे घेण्यात येत आहे,’ असे नमूद करण्यात आले.
ॲड. बाजपेयी म्हणाले, कुलगुरूंनी हे मान्य केले की, सिनेट सदस्यत्व अयाेग्य ठरविण्याचे अधिकारी त्यांना नाहीत. यावरून त्यांना कायद्याची माहिती नाही व १२ ऑगस्टला काढलेले आदेश बेकायदेशीर हाेते. कुलगुरूंकडे न्यायालयात सादर करण्यासाठी कायदेशीर उत्तर नव्हते व त्यामुळे त्यांनी दुसरे पत्र पाठवून आपलाच आदेश फिरवला. मात्र, या प्रकारामुळे आपली जनमानसात नाहक बदनामी झाली व मानसिक त्रास झाल्याचे ॲड. बाजपेयी म्हणाले.
एकीकडे चार महिने वाया गेले तर दुसरीकडे न्यायालयात वेळ व पैसाही खर्च करावा लागला. कुलगुरूंना कायदा समजण्यासाठी चार महिने लागले, यावरून ते कायद्याची वेळेत व निष्पक्ष अंमलबजावणी करू शकत नाहीत, असा आराेप ॲड. बाजपेयी यांनी केला. त्यामुळे कुलगुरूंनी वर्तमानपत्रातून सशर्त जाहीर माफी मागावी व प्रकरण संपवावे, अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा मनमाेहन बाजपेयी यांनी दिला आहे.