नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त
By सुमेध वाघमार | Published: August 25, 2022 06:13 PM2022-08-25T18:13:41+5:302022-08-25T18:14:48+5:30
अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई
नागपूर : राज्यात ओला, उबेर कंपनीकडून सुरू असलेल्या ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ला परवानगी नसतांना नागपुरात ही सेवा धडाक्यात सुरू आहे. याची गंभीर दखल घेत ‘आरटीओने’ तब्बल ४३ टॅक्सी बाइक जप्त केल्या. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
प्रवासी वाहतूकीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) परवाना मिळविणे आवश्यक असते. नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ओला, उबेर कंपनीच्या ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’मधून सर्रास प्रवाशांची वाहतूक सुरू आहे.
नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त
या संदर्भातील तक्रारी वाढल्यानंतर ‘आरटीओ’ने मंगळवारपासून कारवाई हाती घेतली. मंगळवारी ३, बुधवारी २२ तर गुरुवारी १८ अशा एकूण ४३ बाइक जप्त केल्या. यांच्यावर अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.