आरटीओचे गोंडबंगाल, एकाच नंबरच्या दोन गाड्या...
By जितेंद्र ढवळे | Published: May 13, 2024 05:16 PM2024-05-13T17:16:06+5:302024-05-13T17:18:10+5:30
चलान आल्याने झाला भंडाफोड : वाहतूक पोलिसांचाही अजब कारभार
नागपूर(सावनेर) : नागपूर शहरात एकाच नंबरच्या दोन गाड्या आढळणे हा नवा प्रकार नाही. याबाबत पोलिस यंत्रणांकडून तपासही सुरु आहे. मात्र याचे कोडे अद्याप उडलेली नाही. अशाच एकाच नंबरच्या दोन गाड्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सावनेर येथील रहिवासी आकाश तेजसिंग सावजी यांना २४ एप्रिल रोजी त्यांच्याजवळ असलेल्या बुलेट वाहनाच्या (क्रमांक एमएच- ४०, एझेड- ७२०९)च्या मोबाइलवर ऑनलाइन चालान आले. त्यांच्या दोनचाकी वाहनाची ही चालान होती. या चालानबरोबरच दोनचाकी वाहनाचे फोटोसुद्धा आले. या फोटोमध्ये जी गाडी दिसत आहे ती गाडी होंडाची असून या गाडीवर एक युवक बसला असल्याचे दिसून येत आहे. या गाडीवर असलेली नंबर प्लेटवरील नंबर आकाश यांच्या बुलेटच्या नंबरचा आहे.
या फोटोवरून उपरोक्त वाहन चालवीत असलेले युवक अनधिकृत नंबरप्लेट बनवून शहरात फिरत असल्याचे सिद्ध होते. आरटीओमधूनच तर दोन वाहनांना एकच नंबर तर देण्यात आले नाही ना, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
वाहतूक पोलिस कार्यालयातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आरटीओमधूनच एकच नंबर अनेक जणांना देण्यात येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आरटीओ ऑफिसमध्ये दलालांचा हस्तक्षेप. वरील मोटरसायकल चोरीची असल्याचेही नाकारता येत नाही.
अशाच प्रकारची विदाऊट हेल्मेटची एक चालान काही दिवसांअगोदर सावनेर येथील रहिवासी बोकडे यांना आली होती. त्यांची पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा वाहनाचा (क्रमांक एमएच- ४०, एवाय-५९९०) आहे. त्यांनाही चालान आले होते; मात्र बोकडे हे गाडी घेतल्यापासून कधीही नागपूरला गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आकाशचे वडील तेजसिंग सावजी यांनी स्वतः नागपूर वाहतूक पोलिस कार्यालयात जाऊन उपरोक्त प्रकरणाविषयी शहानिशा केल्यानंतर आकाशला पाठविलेली चालान रद्द करण्यात आली.
यावरून अशा प्रकारच्या डुप्लिकेट नंबरप्लेट वापरून अनेक वाहने शहरात फिरत असल्याचे निष्पन्न होत आहे. याचा शोध घेऊन वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी.