भरारी पथकावर आरटीओचा अविश्वास!
By Admin | Published: September 6, 2015 02:42 AM2015-09-06T02:42:48+5:302015-09-06T02:42:48+5:30
शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) नुकताच पदभार स्वीकारलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गप्पा पवार यांनी स्वत:च्याच भरारी पथकावर अविश्वास दाखविला आहे.
ओव्हरलोडवर कारवाईसाठी पथकाची अदलाबदल
नागपूर : शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) नुकताच पदभार स्वीकारलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गप्पा पवार यांनी स्वत:च्याच भरारी पथकावर अविश्वास दाखविला आहे. ओव्हरलोडवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी शहर आरटीओचे भरारी पथक वर्धेला तर वर्धेच्या पथकाला शहरात कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
क्षमतेपेक्षा जादा भार (ओव्हरलोड) घेऊन जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी गेल्या महिन्यात नागपुरात येऊन दिले होते. त्यांनी प्रत्येक आरटीओ कार्यालयाला ओव्हरलोडचे दुप्पट लक्ष्यही दिले आहे. या कारवाईत स्थानिक आरटीओच्या भरारी पथकाकडून वाहतूकदारांना अर्थपूर्ण सवलत मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन, या पथकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आकस्मिक भेटी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. परिणामी, नागपुरातील शहर व ग्रामीण आरटीओ पथकाने ही मोहीम गंभीरतेने घेतली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातील ओव्हरलोडवर कारवाईची संख्या पाहता समाधानकारक आहे. असे असताना पवार यांनी ओव्हरलोड वाहनांवर आणखी प्रभावी कारवाईसाठी भरारी पथकाची अदलाबदल केली.
मात्र, पथकातील मोटार वाहन निरीक्षकांमध्ये या प्रकाराचे नाराजीचे सूर उमटत आहे. सूत्राने सांगितले, १३ सप्टेंबरपर्यंत वर्धेतील पथक शहरातील ओव्हरलोडवर तर शहरातील वायुपथक वर्धेतील ओव्हरलोडवर कारवाई करेल. (प्रतिनिधी)