आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून संपावर; आकृतीबंध अंमलबजावणीची मागणी
By सुमेध वाघमार | Published: September 23, 2024 05:06 PM2024-09-23T17:06:07+5:302024-09-23T17:07:12+5:30
Nagpur : संपामुळे नागपूर शहर, आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता
सुमेध वाघमारे
नागपूर : आकृतीबंधाचा अंमलबजावणीसह महसुल स्तरावरील बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामुळेनागपूर शहर व नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्राचे सहसचिव व नागपूर शहर विभागाचे कार्याध्यक्ष गजानन राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगीतले, मोटार वाहन विभागासाठी शासनाने सुधारीत आकृतीबंध २३ सप्टेंबर २०२२ पासून लागू केले. परंतू त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या. आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी न करता त्याचा आधार घेऊन महसूल विभागस्तरावर बदल्या करण्याची सुत्र शासनाने स्विकारली आहेत. त्यामुळे ३१ आॅगस्ट २०२४ रोजी महसूलस्तरावर बदल्या करण्यात आल्या. या बदल्या मान्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी न्यायालयात (मॅट) दाद मागून त्यावर स्थगिती आदेश पारीत केला आहे.
आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ होत असल्यामुळे व महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबर २०२४ पासून बेमुदत संपावर जात आहे. या संदर्भातील निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी नगपूर (शहर) व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (पूर्व) यांना देण्यात आले आहे. शिष्टमंडळात राठोड यांच्यासह जिल्हा अध्यक्ष मंगेश कडू, प्रशांत रामटेके, श्रीराम पारसे, कैलास डुकरे, अतुल डाकरे, अतुल गेडाम , जयंत देशमुख, विवेक बोंबले, आशिष उपासे, अशोक महल्ले, सुजाना मेश्राम, अमोल राठोड, किरण धमगाये आदींचा सहभाग होता. नागपुरातील तिन्ही आरटीओ कार्यालयातील चतुर्थ व तृतीय श्रेणीतील जवळपास १०० वर कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणीपासून ते लायसन्सची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे.