नागपुरात आरटीओ कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:51 AM2019-01-05T00:51:22+5:302019-01-05T00:52:16+5:30
आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील तीन हजार कर्मचारी वर्ग तीनमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा आकृतिबंध, कार्यालयीन रचना व पदोन्नतीसंबंधी योग्य असा निर्णय घेण्यास परिवहन विभागाला अपयश आले आहे. त्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेकडून अनेकदा मागण्या, निवेदन, प्रतिनिवेदन व पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु कोणताही निर्णय झाला नाही. १० डिसेंबर २०१६ मध्ये आकृतिबंध, कार्यालयीन रचना व पदोन्नतीचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु त्याचा अद्यापही फायदा झाला नाही. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मागण्या शासनापर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले होते. परंतु ११ सप्टेंबर २०१८ च्या परिवहन आयुक्तांच्या आदेशाने ‘ब’ वर्गातील पदेच कमी करण्याचा घाट घातला गेला. याच्या निषेधार्थ मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य कर्मचारी संघटनेचे सहसचिव गजानन राठोड यांच्या नेतृत्वात आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी विवेक थूल, प्रशांत रामटेके, घनशाम घोडके, विजयाश्री नगरकर, राजश्री येनूरकर, आशिष उपासे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.