आरटीओचे कामकाज ठप्प

By admin | Published: April 12, 2017 01:37 AM2017-04-12T01:37:42+5:302017-04-12T01:37:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे धोरण मांडले. या धोरणामधून परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली.

RTO functioning jam | आरटीओचे कामकाज ठप्प

आरटीओचे कामकाज ठप्प

Next

दोन दिवसांपासून इंटरनेट बंद : ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ प्रणालीही संथ
सुमेध वाघमारे नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे धोरण मांडले. या धोरणामधून परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगविले. मात्र ही प्रणाली सुरू झाल्यापासून याचे सर्व्हर संथगतीने सुरू आहे. परिणामी, ‘आॅनलाईन’ अर्ज भरणे कठीण झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण आरटीओ कार्यालयाचे इंटरनेटही बंद पडले आहे. यामुळे परवान्यासह, आरसी व इतरही महत्त्वाची कामे ठप्प पडली आहेत.
राज्यातील बहुसंख्य आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ ही नवी ‘वेब बेस’ प्रणाली सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील आरटीओ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये या प्रणालीद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आली आहेत.
या प्रणालीमध्ये शिकाऊ वाहन परवाना व पक्के वाहन परवान्यासाठी लागणाऱ्या ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’सह इतरही अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु जेव्हापासून ही प्रणाली सुरू झाली आहे तेव्हापासून आरटीओ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी व अर्जदाराला विविध समस्यांमधून जावे लागत आहे. विशेष म्हणजे, तीनही आरटीओ कार्यालयात ही प्रणाली सुरू होऊन महिना होत असताना समस्या कायम आहेत. परवान्यासाठी ज्यांनी जुन्या प्रणालीतून अपॉर्इंटमेंट घेतली आहे, त्यांना नव्या प्रणालीत अपॉर्इंटमेंट घेण्यासाठी तारीख मिळत नाही. इतरही‘आॅनलाईन अर्ज’ भरण्यासाठी तासन्तास वाट पहाण्याची वेळ अर्जदारावर आली आहे.

आॅनलाईन कामे करणाऱ्यांची दुकाने जोरात
शिकाऊ परवान्यासाठी असलेली संगणक परीक्षा व पक्क्या परवान्यासाठी असलेली वाहनाची चाचणी परीक्षा सोडल्यास इतर सर्व कामे ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या वेबबेस प्रणालीमध्ये करण्याची सक्ती आहे. परिणामी, आॅनलाईन कामे करून देणाऱ्यांची दुकानदारी जोरात सुरू आहे. पूर्वी ते शिकाऊ परवान्याची तारीख घेताना ५० ते १०० रुपये घेत असत, आता प्रक्रिया बदलल्यामुळे त्यांनी २०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

परवाना, आरसीची प्रतीक्षा लांबली
ग्रामीण आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंद करणाऱ्यांची, वाहन परवाने घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातच कमी मनुष्यबळ, वाढलेला ताण यामुळे कर्मचारीही त्रासले होते. यातच नवीन प्रणालीचा जलदगतीचा दावा फोल ठरला आहे. ‘नॅशनल इन्फोमॅटिक्स सेंटर’ या एजन्सीचे हे संकेतस्थळ अत्यंत संथ आहे. त्यामुळे वाहननोंदणी, वाहन हस्तांतरण नोंदणी इत्यादी कामांना विलंब होत आहे. यातच कार्यालयाला पुरविण्यात आलेली ‘बीएसएनएल’ची इंटरनेटची सेवा दोन दिवसांपासून खंडित झाली आहे. यामुळे परवाना, आरसीची प्रतीक्षा लांबली असून अनेकांवर कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.

Web Title: RTO functioning jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.