आरटीओ : विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या निरीक्षकाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:56 PM2019-08-22T21:56:24+5:302019-08-22T22:34:27+5:30

शहर आरटीओ कार्यालयाच्या एका मोटार वाहन निरीक्षकाने विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन कारवाईसाठी चक्क आरटीओ कार्यालयात आणली.प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी संबंधित निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

RTO: Notice to the inspector who is stalking the students | आरटीओ : विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या निरीक्षकाला नोटीस

आरटीओ : विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या निरीक्षकाला नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देपरिवहन आयुक्तांच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्याना शाळेत किंवा घरी सोडून दिल्यावरच स्कूल बस किंवा व्हॅनवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश असताना शहर आरटीओ कार्यालयाच्या एका मोटार वाहन निरीक्षकाने विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन कारवाईसाठी चक्क आरटीओ कार्यालयात आणली. यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ ताटळत रहावे लागले, याची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी संबंधित निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विशेष म्हणजे, बुधवारी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी कार्यालयाला दिलेल्या भेटीत ज्या सूचना केल्या त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्कूल बस, अवैध वाहतूक, अवैध जडवाहतूक तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. 


मोटार वाहन निरीक्षक वासुदेव मुगल यांनी बुधवारी भवन्स, सिव्हील लाईन्स येथील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एमएच- ३१, डीएस- ५१९७ क्रमांकाच्या स्कूलव्हॅनची दुपारी ३- ३.३० च्या सुमारास तपासणी केली. व्हॅन चालकांकडून नियमांची कुठेच अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विद्यार्थ्यांसह व्हॅन आरटीओ कार्यालयात जप्त करण्यासाठी आणली. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना घरी पोहचविणे आवश्यक होते. घरी जायला विलंब होत असल्याने वाहनातील लहान मुले रडू लागली. वाहन चालकाने वाहनाच्या कागदपत्रासह त्याचा परवाना देत मुलांना सोडून लगेच परत येत असल्याचे अधिकाऱ्याला सांगितले. परंतु अधिकाऱ्याने न ऐकता मुलाला दुसऱ्या वाहनातून सोडण्याचा हट्ट धरत त्यांना ताटकळत ठेवले. ही माहिती उपस्थितांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना दिली.त्यांनी तातडीने मुगल यांना त्या वाहनात बसून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी सोडल्यावर कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर विद्यार्थी घरी पोहचले. सूत्रानूसार, मुगल यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशीही सुरू आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी मनवर यांनी मात्र या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच मनवर यांनी आपल्या सर्व अधिकारी व मोटार वाहन निरीक्षकांना स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करताना मुलांना शाळेत सोडल्यावर किंवा घरी सोडल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
ओव्हरलोडवर कारवाई
क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करणाऱ्या (ओव्हरलोड) वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करण्याचे निर्देश गुरुवारी सर्व अधिकारी व मोटार वाहन निरीक्षकांना दिले. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसलेल्या विशेषत: ऑटोचालकांवर कारवाई करण्याचे व स्कूल बस व व्हॅन तपासणी मोहिमेला गती देण्याचा सूचनाही त्यांनी केल्या.

Web Title: RTO: Notice to the inspector who is stalking the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.