आरटीओ ऑनलाईन, तरी दलालांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:53 AM2021-08-18T11:53:46+5:302021-08-18T12:01:59+5:30
Nagpur News दलालांना फाटा देण्यासाठी परिवहन विभागाने ‘ऑनलाईन’प्रणाली आत्मसात केली; परंतु सात वर्षांच्या कालावधीनंतरही या प्रणालीचा फायदा सामान्यांना कमी आणि दलालांनाच जास्त होत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध, सुनियोजित पद्धतीने, अधिक कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी आणि दलालांना फाटा देण्यासाठी परिवहन विभागाने ‘ऑनलाईन’प्रणाली आत्मसात केली; परंतु सात वर्षांच्या कालावधीनंतरही या प्रणालीचा फायदा सामान्यांना कमी आणि दलालांनाच जास्त होत असल्याचे चित्र आहे. याचे वास्तव म्हणजे, आरटीओ कार्यालयाच्या आत व परिसरात फोफावलेले अनधिकृत ‘ऑनलाईन सेंटर’. याच्या आड दलालांचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
पूर्वी आरटीओ कार्यालयात दलालांशिवाय काडीही हलत नव्हती, असे चित्र होते. आजही यात फारसा बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, कार्यालयातील गर्दी, तासन्तास रांगेत उभे राहण्याची येत असलेली वेळ, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी व दलालांना दूर ठेवण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली. २०१४ मध्ये नागपुरात या प्रणालीला शिकाऊ वाहन परावान्यापासून सुरुवात झाली. नंतर पक्के वाहन परवाने, ई-पेमेंट व इतरही कामकाजांचा समावेश करण्यात आला. नुकतेच घरी बसूनच ऑनलाईन लर्निंग लायसन्स परीक्षा देण्याची सोयही उपलब्ध झाली. सध्याच्या स्थितीत ‘ऑनलाईन’मार्फत कार्यालयातील ५० वर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु बहुसंख्य नागरिकांना ‘वेबसाइट’चे नावच माहिती नाही, येथून सुरुवात आहे. यामुळे पूर्वी आरटीओच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहून ‘कोणते काम आहे’ अशी विचारणा करणाऱ्या दलालांनी आता कार्यालयासमोर पानटपऱ्यांसारखी दुकाने मांडून ‘ऑनलाईन सेंटर’च्या आड दलाली करीत आहे. यात मोठा फायदा असल्याने तिन्ही आरटीओ कार्यालयांचा परिसर या सेंटरच्या विळख्यात सापडला आहे.
-किचकट प्रणालीमुळे नाइलाजाने दलालांची मदत
‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर वाहन परवाना काढण्यापासून परवाना नूतनीकरण करणे, शुल्क भरणे, कागदपत्रे डाऊनलोड करून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची सोय आहे; परंतु या किचकटप्रणालीमुळे संगणकाचे ज्ञान असलेल्या लोकांनाही यात अडचणी येतात. शिवाय कागदपत्रे डाऊनलोड करणे, ऑनलाईन शुल्क भरणे, त्याची प्रिंट काढणे आदींची अनेकांकडे सोय राहत नाही. यामुळे नाइलाजाने अनेकांना आरटीओ कार्यालयासमोरील दलालांच्या ऑनलाईन सेंटरवरच यावे लागत असल्याचे वास्तव आहे.
-अधिकारीच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या हाताखाली दलाल
आरटीओ कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे विविध कामानिमित्त अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर होणारी गर्दी रांगेत लावण्यासाठी, दलालांकडून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी, दलालांकडून पैसे जमा करण्यासाठी व अधिकाऱ्यांची छोटी-मोठी कामे करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी दलाल ठेवून घेतले आहेत. अधिकाऱ्यांचे पाहून कर्मचाऱ्यांच्याही हाताखाली दलाल वावरत असल्याचे आरटीओ कार्यालयाचे चित्र आहे.
-दलालांकडून दुप्पट-तिप्पट शुल्क वसूल
शिकाऊ दुचाकी वाहन परवान्यासाठी ऑनलाईन अपाॅइंटमेंट घेण्याचे शुल्क २०१ रुपये असताना दलाल याच्या अडीच पट शुल्क आकारतात. परमनंट दुचाकी वाहन परावान्याचे शुल्क ७६६ रुपये असताना दलाल १५०० रुपये घेतात. वाहन परवाना नूतनीकरणाचे शुल्क ४६६ रुपये असताना दलाल १००० रुपये घेतात. विशेष म्हणजे, ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी दलाल १०० रुपयांची मागणी करतात.
-दलालांकडून गेल्यास झटपट कामे
उमेदवाराच्या अर्जावर दलालाचा स्टॅम्प किंवा विशिष्ट नाव लिहून असल्यास त्या अर्जदाराची कामे लवकर होत असल्याचे आरटीओमधील वास्तव आहे. काहींना तर रांगेतही लागावे लागत नाही. सध्या आरटीओ कार्यालयात १०० वर दलाल कार्यरत आहेत.