आरटीओ : वाहन परवान्याची कामे सोमवारपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:31 PM2020-06-20T22:31:31+5:302020-06-20T22:32:50+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्याची कामे सोमवार २२ जूनपासून सुरू होत आहे.

RTO: Vehicle license work starts from Monday | आरटीओ : वाहन परवान्याची कामे सोमवारपासून सुरू

आरटीओ : वाहन परवान्याची कामे सोमवारपासून सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशिकाऊसाठी रोज ५० तर कायम परवान्यासाठी ९० चा कोटा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्याची कामे सोमवार २२ जूनपासून सुरू होत आहे. परंतु फिजिकल डिस्टन्सिंगमुळे शिकाऊ परवान्यासाठी रोज ५० तर कायम परवान्यासाठी ९० उमेदवारांचा कोटा निश्चित करण्यात आल्याने परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यावर दोन ते तीन महिन्याची प्रतीक्षा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारी शासकीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. नागपूर आरटीओमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना परवाना देणे, तसेच नवीन वाहनांची नोंदणी सोडून इतर सर्व कामे बंद होती. आता परिवहन आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार शिबिर कार्यालयांमधील कामे वगळता उर्वरित सर्व कामांना सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. यात परवाना जारी करणे, दुय्यम परवाना काढणे, परवानाविषयक सर्व कामे होणार आहे. याशिवाय वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहनविषयक सर्व कामे, वायुवेग पथक आदी कामकाज नागपूर शहर, ग्रामीण आरटीओ व पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू होणार आहे.
आरटीओ कार्यालयातील उपलब्ध कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामाकरिता कोटा निश्चित करण्यात आला आहे. शिकाऊ परवान्यासाठी ५० अर्जांचा कोटा तर पक्क्या परवान्याकरिता ९० अर्जांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ज्या परवाना अर्जदारांनी अपॉईंटमेंट घेतली होती अशा अर्जदारांचे अपॉईंटमेंट रि-शेड्यूल करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा मॅसेज संबंधित अर्जदारांच्या मोबाईलवर पाठविण्यात आल्याचे आरटीओकडून कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनपूर्वी शिकाऊ वाहन परवान्याचा २०० तर पक्क्या वाहन परवान्याचा १५० वर कोटा होता. यामुळे प्रतीक्षेची यादी लांबणार आहे.

कार्यालयात प्रवेशासाठी मास्क व हॅण्डग्लोव्हज आवश्यक
आरटीओ कार्यालयात प्रवेशासाठी मास्क व हॅण्डग्लोव्हज आवश्यक असल्याचेही आरटीओने म्हटले आहे. तसेच ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर व वाहन सॅनिटायझेशन केल्यानंतरच दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घेण्यात येणार आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझेशन झाल्यानंतरच चाचणी करण्यात येणार असल्याचीही अट घालण्यात आली आहे. सॅनिटायझेशनचा खर्च वाहन मालकाला करावयाचा आहे.

वाहनांशी निगडित कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत
लॉकडाऊनच्या काळात मुदत संपलेली किंवा मुदत संपणारी वाहनांशी निगडित सर्व कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये गाडी चालवण्याचा परवाना, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, विविध प्रकारचे परमिट, फिटनेस प्रमाणपत्र आणि इतर संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

Web Title: RTO: Vehicle license work starts from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.