आरटीपीसीआर चाचणीचे नमुने उशिराने रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:48+5:302021-05-10T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : येथे दररोज, नियमितपणे आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट केली जाते. अँटिजन टेस्टचा अहवाल तातडीने कळत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : येथे दररोज, नियमितपणे आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट केली जाते. अँटिजन टेस्टचा अहवाल तातडीने कळत असला तरी आरटीपीसीआर चाचणीचे नमुने नागपूर येथे पाठविले जातात. दुसऱ्या दिवशी अहवाल येतो. असे असताना काही दिवसापासून आरटीपीसीआरचे नमुने दररोज नागपूरला रवाना होत नसल्याची बाब उजेडात येत आहे. नमुनेच उशिराने पोहचविले जात असल्याने त्याचा अहवालसुद्धा उशिरानेच मिळत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या या लेटलतीफ कारभारामागे काय गणित असावे, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.
पूर्वी नागपूर येथे आरटीपीसीआर चाचणीचे नमुने पाठविल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अहवाल कळत होता. या बाबीची दखल घेत आता आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दुसऱ्या दिवशीच कळतो आणि मिळतो. ज्यादिवशी आरटीपीसीआर चाचणी झाली असेल त्याचदिवशी चाचणीचे नमुने पाठविले जाणे गरजेचे आहे. असे असतानाही उमरेड येथून कधी एक दिवसाआड तर कधी दोन दिवस उशिराने आरटीपीसीआरचे नमुने वाहनाने नागपूरला पाठविले जात आहेत.
याबाबत कानोसा घेतला असता, संबंधित कर्मचाऱ्याने आम्ही दररोज नमुने पाठवितो, असे स्पष्टीकरण दिले. शासन-प्रशासनाच्या वतीने आरटीपीसीआर नमुने नागपूरला पाठविण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली आहे. असे असतानाही इंधन खर्च वाचविण्यासाठी हा प्रकार तर होत नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. कागदोपत्री सर्वकाही ठीक असले तरी या प्रकरणाची चौकशी झाल्यास घबाड उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. खानम यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.