नागपुरात शिक्षकाचे विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:47 PM2018-10-24T22:47:12+5:302018-10-24T22:48:39+5:30
शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी तक्रारपेटीत केली होती. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी शाळा प्रशासनाने जि.प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे केल्या आहेत. सीईओंनी याची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश बजावले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी तक्रारपेटीत केली होती. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी शाळा प्रशासनाने जि.प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे केल्या आहेत. सीईओंनी याची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश बजावले आहेत़
मिळालेल्या माहितीनुसार, काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जि. प. माध्यमिक कन्या शाळा, सदर येथील सहायक शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे हे मागील अनेक दिवसांपासून शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करीत असल्याबद्दल मुलींनी शाळेच्या तक्रारपेटीत तक्रारी टाकल्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापकाने त्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत त्याची एक प्रत जि. प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे पाठविली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सीईओंनीही त्वरित या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना दिले आहेत़ मात्र, आज या तक्रारीला महिना लोटण्याच्या मार्गावर आहे, परंतु यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई झाली नाही.
मुख्याध्यापकाचे माझ्या विरोधात षड्यंत्र
ज्या मुख्याध्यापकांनी ही तक्रार केली़, ते चकोले सिनिअॅरिटी डावलून प्रभारी मुख्याध्यापकपदी रुजू झाले आहेत. याबाबत माझा संघटनात्मक वाद त्यांच्याशी सुरू आहे़ त्यांची दोनदा बदली करण्यात आली. राजकीय बळाचा वापर करून त्यांनी ती थांबविली़ मला केवळ एक वर्ष या शाळेत होत आहे़ अधिक काही पाऊल मी टाकेल म्हणून त्यांनी विद्यार्थिनींना हाताशी पकडून असा घृणास्पद प्रकार केला आहे.
राजेंद्र मरसकोल्हे, सहायक शिक्षक, जि. प़ माध्यमिक कन्या शाळा