राज्यकर्त्यांनी पाणीटंचाई समोर ठेवून नियोजन करावे : अभिजित घोरपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:14 PM2018-10-20T23:14:49+5:302018-10-20T23:17:34+5:30
पाण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांकडून वस्तुस्थिती मांडल्या जात असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांकडून वस्तुस्थिती मांडल्या जात असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी आज येथे केले.
महिला पाणी मंच आणि आकांक्षा मासिकाच्यावतीने शंकरनगरच्या साई सभागृहात आयोजित सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले. व्यासपीठावर संयोजक अरुणा सबाने, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, उल्का महाजन, बबनराव तायवाडे, वंदना महात्मे, रमेश बोरकुटे, वृंदा ठाकरे, अतुल गुडधे उपस्थित होते. अभिजित घोरपडे म्हणाले, पाणीप्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात बऱ्याच भागात दुष्काळ असताना स्मार्ट सिटीमध्ये पाण्याची गळती ४० ते ४५ टक्के आहे. जलसाक्षरता नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून पाण्याचा अपव्यय टाळण्यास सुरुवात करावी. माजी मंत्री वसंत पुरके म्हणाले, साहित्यातून जीवनाचे प्रतिबिंब प्रतिबिंबित होण्याची गरज आहे. संवेदनशील नेतृत्व असले की पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नसून पुढील संमेलनात जलसंपदा मंत्र्यांना बोलविण्याची सूचना त्यांनी केली. उल्का महाजन म्हणाल्या, पाण्याचा प्रश्न सामाजिक न्यायाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे. उद्योगधंद्यांमुळे नद्या, धरणे प्रदूषित होत असून नदीशेजारी उद्योगांना जागा खुल्या करण्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकातून अरुणा सबाने यांनी गावोगावची पाणीटंचाई पाहून साहित्यिकांना या चळवळीशी जोडल्याचे सांगून महिला पाणी मंचाने पाणीटंचाईबाबत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते नीर-क्षीर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात गो. ना. मुलघाटे चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले.
साहित्यिकांची मने मोठी व्हावीत : सुरेश द्वादशीवार
साहित्यिकांच्या मनात खेड्यातील नागरिकांच्या समस्या येणे गरजेचे असून साहित्यिकांची मने मोठी झाली पाहिजेत. साहित्यिकांनी समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास समाजही त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल, असे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पाणीटंचाई दूर करण्याची जबाबदारी असलेले बेजबाबदारपणे वागत आहेत. तेलंगणातील पाणीप्रश्न तेथील राज्यकर्त्यांनी सोडविला. त्यामुळे राज्यकर्त्यांना नाकर्तेपणा सोडण्याची गरज आहे. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन पाणीप्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.